Exclusive : “तो युनिफॉर्म घातल्यानंतर वेगळच वाटतं..”, अलका कुबल यांनी ‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत परिचारिकांना केलं सलाम 

By  
on  

कोरोना सारख्या संकटकाळात सध्या परिचारिका या अहोरात्र कोरोना वॉरियर्स बनून कोरोना रुग्णांची सेवा करतायत. याच परिचारिकांचा गौरव दिवस म्हणजे जागतिक परिचारिका दिन. दरवर्षी 12 मे हा दिवस हा दिवस परिचारिका म्हणजेच नर्सेसच्या कार्याचा गौरव दिवस असतो. चित्रपट माध्यमातूनही अनेकदा या परिचारिकांच्या कार्याचा उल्लेख केलेला पाहायला मिळालय. ‘डॉक्टर डॉक्टर’ या कॉमेडी मराठी चित्रपटात सामाजिक मुद्दायवर भाष्य करण्यात आलं होतं. याच चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल या परिचारिकेच्या भूमिकेत झळकल्या होत्या.
पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीच्या माध्यमातून अलका कुबल आठल्ये यांनी या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिलाय याशिवाय सध्याच्या कोरोना काळात निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या परिचारिकांना सलाम केलाय. 
‘डॉक्टर डॉक्टर’ या मराठी चित्रपटात अलका कुबल यांच्यासह अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, कुलदीप पवार हे कलाकार झळकले होते. या चित्रपटात अलका कुबल यांनी साकारलेली परिचारिकेची भूमिका लक्षवेधी ठरली होती. जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने त्यांनी या भूमिकेच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्या सांगतात की, “या चित्रपटाला जवळपास 30 वर्षे झाली. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे होते म्हणून ही फिल्म कॉमेडी होती. पहिल्यांदा मी तशा पद्धतीचं कॅरेक्टर केलं होतं. ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी मिळून काळा कारभार उघडकीस आणतो. मला खूप मजा आली होती ती भूमिका करताना. खरतर तो युनिफॉर्म घातल्यानंतर पण वेगळच वाटतं. अभिनेत्री जरी असले तरी अशा भूमिका आल्या की त्या भावना सहाजिकच येतात. अशा पद्धतिचे कॅरेक्टर्स करणं किंवा समाजसेवकांची पात्रं साकारणं यातून त्यांच्या जॉनरमध्ये जाणं, त्यांचं कार्य काय आहे याचा विचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. अशी पात्रं साकारल्यानंतर अभिमान वाटतो की आपण अशा पद्धतिच्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाच्या वेळी मला प्रचंड मजा आली होती. कॉमेडी फिल्म जरी असली तरी त्यातून एक सामाजिक मुद्दा मांडला होता.”

सध्याच्या काळात परिचारिकांचं कार्य मोलाचं आहे. आपल्या कुटुंबापासून दूर राहुन इतर कुटुंबांच्या रुग्णांची काळजी घेण्याचं काम ते करतायत. याच परिचारिकांना अलका कुबल सलाम करतात. त्या म्हणतात की, “नर्सेसची ड्युटी ही 12 महिने कायम असतेच पण मागच्या वर्षापासून जेव्हा कोरोनाचा काळ सुरु झाला या नर्सेसनी जनतेसाठी वाहुनच घेतलय. त्यांना घर आणि हॉस्पिटल दोन्ही सांभाळताना खूप कसरत करावी लागतेय. या नर्सेसचे परिवार सपोर्ट करत असले तरी काही नर्सेसना लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांना ड्युटीवरून घरीही जाता येत नाही कारण मुलांना संसर्ग होण्याची भिती असते. म्हणूनच अनेक नर्सेस वेगळ्या राहत आहेत. सध्याच्या काळात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणूनच त्यांना माझा सलाम आहे.”


पुढे त्या म्हणतात.. “आत्ताच्या काळात हे सगळे देवासारखे आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, समाजसेवक, पालिका कर्मचारी, सरकारी कर्मचारी या सगळ्यात स्वत:ला ज्यांनी वाहून घेतलय त्या सगळ्यांनाच सलाम.  स्वत:च्या जीवाचा विचार न करता ते हे काम करत असतात. हे सगळेच ग्राउंड लेव्हलला अगदी तळमळीने काम करतात. अशा लोकांना मनपुर्वक अभिवादन.

सध्याच्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तिचा कोरोनाने जीव गेला की त्याचं खापर डॉक्टर्स, नर्स आणि इतर स्टाफवर फोडलं जातं. यात माणूसकीच्या नात्याने विचार करणं गरजेचं असल्याचं त्या सांगतात. 
अलका कुबल म्हणतात की, “सध्याच्या काळात काम करत असलेल्या नर्सेस ज्या आहेत त्यांच्यासाठी नीट सोयीदेखील नसतात. कुणाचं मरण अचानक झालं तर हल्ली डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांच्यावर हात उचलले जातात. मला असं वाटतं की यात त्यांचा काय दोष ? ते दिवस रात्र निस्वार्थीपणे सेवा करतात आणि पण त्यांचा यात दोष आहे का ? हे तरी पाहायला हवं. त्यांच्यावर राग का काढला जातो ? त्यांना काय सिक्युरिटी असते का ? ते आपला जीव गहाण ठेवून काम करतात. अशावेळी माणूसकीच्या नात्याने विचार करायला हवा.”

परिचारिका दिनाच्या निमित्ताने अलका कुबल यांनी या अहोरात्र रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या परिचारिकांना अभिवादन केलं आहे.


सध्या अलका कुबल यांची निर्मिती असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मालिकेची संपूर्ण टीम सिल्वासा येथे आहे. याआधी या मालिकेचं चित्रीकरण गोव्यात सुरु होतं. मात्र गोव्यात चित्रीकरणाला बंदी असल्याने आता या मालिकेच्या टीमने सिल्वासा या ठिकाणी चित्रीकरणाला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगीतलं. 

Recommended

Loading...
Share