By  
on  

Exclusive :  अभिनेत्री अक्षया देवधरने या नव्या व्हिडीओतून दाखवलं गायन कौशल्य, म्हणते “शाळेत असल्यापासून समूह गीत स्पर्धांमध्येही भाग घ्यायचे”

लोकप्रिय प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘युवा’ या सिनेमातील ए आर रहमान यांचं संगीत असलेल्या “कभी नीम नीम..” गाण्याची जादू काही वेगळीच आहे. असंख्य लोकांना भुरळ पाडलेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे. कधी या गाण्यावर नृत्य सादर करणं, त्याच्यावर सांगीतीक प्रयोग करणं या सगळ्या गोष्टी या गाण्याच्या बाबतीत होत असतात.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अंजली आणि पाठक बाई म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया देवधरनेही असाच एक नवा प्रयोग केला आहे. अक्षयाला गाण्याची प्रचंड आवड आहे. गायनाचं शिक्षण घेतलं नसलं तरी गायनाची आवड तिला लहानपणापासूनच आहे. हीच आवड तिने एका नव्या म्युझिक व्हिडीओतून जोपासली आहे.

अक्षया आणि तिच्या काही मित्र मंडळींनी मिळून “कभी नीम नीम” या गाण्याचं कव्हर तयार केलं आहे. ज्यात अक्षयाने आपल्या मैत्रीणीसोबत डुएट गाणं गायलं आहे. नुकतच हे गाणं प्रदर्शित झालं असून अक्षयाच्या वाढदिवसानिमित्ताने पिपींगमून मराठीने अक्षयाशी संवाद साधला. यावेळी तिने गाण्याची आवड आणि या नव्या उपक्रमाविषयी सांगीतलं. 
अक्षया म्हणते की, “आम्ही कॉलेजमधून जेव्हा नाटक करायचो, फिरोदियामध्ये वैगेरमध्ये काम करायचो, त्यावेळी मी थोडंफार गायचे आणि मला असं वाटतं की मला थोडंफार सुरात गाता येतं. माझ्या मैत्रीणीला हे माहिती होतं. जेव्हा मी कामातून थोडी फ्री झाले तेव्हा ती मला म्हटली की आपण दोघी मिळून जसं पूर्वी गायचो तसं काहीतरी करुयात का? मग आम्ही लॉकडाऊनच्या काळात घरातल्या घरात शूट करुन, स्टिडीओत ते गाणं रेकॉर्ड करून त्याचा छोटासा व्हिडीओ तयार केला. खूप दिवसांत आम्ही एकत्र काही काम केलं नव्हतं म्हणून एक मनोरंजन म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे.”
या गाण्याला अक्षयाचा सुरेल आवाज लाभला आहे. हे गाणं अक्षयाने उत्तम गायलं असून याविषयी सांगताना गायनाची आवड अगदी लहानपणापासून असल्याचं अक्षया सांगते, “मी अगदी शाळेत असल्यापासून समूह गीत स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. मी शाळेत असल्यापासून गाते पण कधीही गाणं शिकलेली नाही, त्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही . त्यामुळे असं एकटं कधी गायले नसल्याने माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यानूसार आम्ही हे डुएट गायलं. त्यानिमित्ताने मी छान सराव वैगेर करुन गाणं गायलं आहे.”

स्वप्निल भावे, केतन पवार यांनी हे गाणं रिअरेंज केलय. अक्षयाने तिची मैत्रीण स्नेहल भावेसोबत मिळून हे डुएड गाणं गायलय. मुक्ता लेलेने या गाण्यात नृत्य सादर केलय. स्वप्निल भावे, स्नेहल भावे, केतन पवार यांनी वोकल रिदम दिली असून मंदार बोगडेच्या ढोलकीची साथ या गाण्याला मिळालीय. या गाण्यावर केलेल्या नव्या प्रयोगाविषयी अक्षया सांगते की, “माझी आणखी एक मैत्रीण त्यात आहे जी डान्सर आहे तिनेही यात सहभाग घेतला.  या व्हिडीओसाठी काम करणारी सगळी मंडळी हे माझे मित्र-मैत्रिणी आहेत. त्यांनी बॅकग्राउंड स्कोअर देखील वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. काही आवाज तोंडाने काढून त्याला बॅकग्राउंड देण्यात आलाय. हा एक छोटोसा प्रयत्न म्हणून आम्ही ते केलय.”

नुकतच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे बरीच वर्षे मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या अक्षयाला आता मोकळा वेळ मिळाला आहे. या वेळेचा उपयोग विविध उपक्रमांसाठी आणि स्वत:साठी करण्याची अक्षयाची इच्छा आहे. ती म्हणते की, “मी टेलिव्हिजन मिस करतेय पण एवढ्यात टेलिव्हिजनवर काही नवी करेन असं मला वाटत नाही. कारण मोठ्या काळासाठी मी घरापासून बाहेर होते. त्यामुळे अजून दोन महीने तरी मला सध्या काही करावसं वाटत नाहीय. मी सध्या असे काही छोटे उपक्रम घेऊन येईल, मी अशा छोट्या उपक्रमांमधून सक्रिय नक्की राहील. ज्यातून माझा पूर्ण वेळ नाही जाणार आणि मला माझ्या आवडीचं कामही करता येईल. दीडे ते दोन महिन्यांनी मी नक्कीच काहीतर मोठं करण्याचा विचार करीन.”

अक्षया आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना मिळून केलेला हा म्युझिक व्हिडीओ पाहणं रिफ्रेशिंग ठरतय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Recommended

PeepingMoon Exclusive