PeepingMoon Exclusive : अभिनेत्री आदिती सारंगधरला आलं होतं नैराश्य, या मालिकेने परत मिळवुन दिला आत्मविश्वास 

By  
on  

अभिनेत्री आदिती सारंगधरने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. नाटक, मालिका, चित्रपट आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिती एक उत्तम अभिनेत्री म्हणून समोर आलीय. या दरम्यान आदितीने अशा काही भूमिका साकारल्या ज्याचा उपयोग तिला तिच्या खऱ्या आयुष्यातही झालाय. 'येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मालविका या भूमिकेविषयी पिपींगमून मराठीने आदितीसोबत संवाद साधला आहे. यावेळी आदितीने या भूमिकेसह तिने आत्तापर्यंत साकारलेल्या व्यक्तिरेखेविषयीही सांगितलं. त्या त्या भूमिकांचा तिच्या खऱ्या आयुष्यात कसा प्रभाव राहिला हे तिने यावेळी सांगितलं.
सध्या आदिती मालविका हे खलनायिकेचं पात्र साकारतेय. पण याआधी विविध मालिकांमधून आदिती वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये झळकली आहे. यापैकी ‘’लक्ष्य या मालिकेने आदितीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आदिती नैराश्येमध्ये असताना या मालिकेतील पात्रामुळे तिला आत्मविश्वास मिळाल्याचं ती सांगतेय.

आदिती म्हणते की, "लक्ष्य मालिकेतील सलोनी देशमुखची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यावेळी खरे पोलीस देखील मला अक्षरक्षह: रस्त्यात सॅल्युट करायचे आणि मला कसतरी वाटायचं. जेव्हा मला खरच कामाची गरज होती, पैश्यासाठी नाही तर जेव्हा आपल्याला चांगलं काम हवं असतं तेव्हा ही मालिका मला मिळाली होती. जवळपास साडे पाच वर्षे ही मालिका चालली होती. मी तेव्हा नैराश्येमधून जात होते. तेव्हा माझा स्वत:मधील आत्मविश्वास गेला होता. मी व्यवस्थित चालू, बोलू शकेल की नाही, वाचू शकेल की नाही, त्यावेळी माझ्यात इतकाही आत्मविश्वास नव्हता. तेव्हा लक्ष्य या मालिकेने माझा आत्मविश्वास परत मिळवुन दिला. मी माझ्या आयुष्यातील एका वाईट टप्प्यावर होते. त्यावेळी मी माझ्या आईलाही गमावलं होतं. आईचं निधन झालं होतं, शिवाय रिलेशनशीपमध्येही बरेच अडथळे येत होते. पुन्हा मी एकटी राहु लागले होते. माझ्यासाठी तो फार कठीण प्रसंग होता. पण मला असं वाटतं की लक्ष्य ने मला तो आत्मविश्वास दिला की, सलोनी सारखं मी देखील यातुन मार्ग काढू शकते. या मालिकेने माझ्यात कलाकार म्हणून एक वेगळा बदल घडवून आणला होता.”

आदितीचा नैराश्येकडून आत्मविश्वासापर्यंत पोहोचण्याचा प्रवास लक्ष्य या मालिकेतील सलोनी या पात्रामुळे शक्य झाला. त्यातून स्वत:ला सावरत आदितीने हे पात्र साकारलं आणि ते प्रचंड लोकप्रियही ठरलं.

याशिवाय ‘हम बने तुम बने’ या मालिकेत काम करण्याविषयीही आदिती बोललीय. ती सांगते की, “त्यावेळी मी नुकतीच आई झाले होते. ती मालिका पालकत्वाविषयी होती. माझा आई असण्याचा पुढचा प्रवास त्या मालिकेने सुखकर केला. शिवाय आई म्हणून माझं जगणं सोपं केलं असं मला वाटतं.”

आदितीला वेगवेगळ्या टप्प्यावर विविध भूमिकांनी मदत केली. ती सांगते की, “वयाच्या 21 व्या वर्षी मला वादळवाट सारखी मालिका मिळाली. मला त्या मालिकेतून इतकं सुंदर लिखाण असून शकतं, इतकं सुंदर बोलायचं आहे, ही प्रक्रियाच माझ्यासाठी शिकण्यासारखी होती. त्या मालिकेतून मी खूप काही शिकले. स्वत:ला प्रेझेंट कसं करायचं हे देखील शिकले. खूप चांगली माणसं माझ्या आजूबाजूला काम करत होती. वादळवाट नंतर मी अभिलाषा केली. त्यातून आपलं प्रेझेंटेशन चुकलं तर कुठे गडबडू शकतो हे मला त्या मालिकेने शिकवलं.”

या वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यात आदिती विविध गोष्टी शिकत गेल्याचं ती सांगतेय. सध्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मालविका ही भूमिका साकारताना एका वेगळ्या प्रवासात आदिती आहे. आदितीला ही मालविका खलनायिका जरी असली तरी ती खरी आणि बिचारी वाटते. ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय असून मालविकाचं पात्रही लोकप्रिय ठऱतय.

Recommended

Loading...
Share