By  
on  

PeepingMoon Exclusive : शेवटचा पडदा पडेपर्यंत दिलीप कुमार यांनी पाहिलं होतं हे मराठी संगीत नाटक, अशोक सराफ यांनी शेयर केली आठवण

लोकप्रिय अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने हिंदीसह मराठी सिनेविश्वातही शोककळा पसरली आहे. आज बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.  अनेक कलाकारांसाठी अभिनयाचं विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दिलीप सहाब यांना संपूर्ण सन्मानात आणि शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात येणार आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी देखील दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पिपींगमून मराठीने अशोक सराफ यांच्याशी बातचीत केली आहे. यावेळी अशोक मामांनी दिलीप कुमार यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीने श्रेष्ठ नट गमावल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणतात की, "माणूस म्हणून ते ग्रेट होतेच ते. माणूस ग्रेट असल्याशिवाय कलाकार होत नाही. अतिशय बुद्धिमान कलाकार ते होते. त्यांच्या जाण्यानं खरचं चित्रपटसृष्टीची हानी झालीय. त्यांनी स्वतचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं.  सगळ्यांपेक्षा त्यांची एक वेगळीच शैली होती. बऱ्याच जणांनी तसं करण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रमाणात ते त्यांना नाही जमलं. शेवटी दिलीप कुमार हेच दिलीप कुमार राहिले. त्यांनी जी भूमिका केली ती स्मरणात राहण्यासारख्या होत्या. शांत स्वभावाचे, हळू आवाजात बोलणारे होते. त्यांच्यासोबत माझी जवळीक झाली नाही कारण त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रसंगच कधी आला नाही. पण त्यांच्या एकंदर प्रकृतीवरुन असे वाटायचे की ते शांत स्वभावाचे माणूस असावेत. त्यांनी स्वत:चं एक वेगळं विश्व निर्माण केलं, एक वेगळी स्टाईल निर्माण केली होती. ती स्टाईल नंतर परत कुणाला जमली नाही असं म्हणावं लागतय. एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नट आपण गमावलाय असं मला वाटतय."

दिलीप कुमार यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ यांनी त्यांच्यासोबतचा एक किस्सा शेयर केला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी  'संशयकल्लोळ' या संगीत नाटकासाठी दिलीप कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यावेळचा किस्सा त्यांनी सांगितला. ते सांगतात की, "दिलीप कुमार एकदा आमच्या नाटकाला आले होते. मराठी नाटक 'संशयकल्लोळ'साठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. ते संगीत नाटक होतं. संगीत नाटक हे बराच वेळं चालतं. जवळपास 5 ते 6 अंक होते त्या नाटकाचे. ते बराच वेळ चालायचं. साधारणता मराठी माणूस सुद्धा इतकं मोठं संगीत नाटक पाहायला कंटाळतात. पण दिलीप कुमार पहिल्या अंकापासून ते शेवटचा पडदा पडेपर्यंत शेवटपर्यंत तिथे बसून होते. कुठेही गेले नाहीत. त्यांनी शेवटपर्यंत ते नाटक पाहिलं. ही त्यांची सगळ्यात मोठी खुबी होती. शिवाय त्यांना मराठीही कळत होतं. इतर कलाकारांच्या कलेचं कौतुक करणं ही त्यांची मोठी गोष्ट होती जी प्रत्येक कलाकाराने आत्मसाद केली पाहिजे."

Recommended

PeepingMoon Exclusive