अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं नुकतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालय. अनेकांना या बातमीने मोठा धक्का बसलाय. तर काहींना सिंधुताईंसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडितलाही सिंधुताईंच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे. सोशल मिडीयावरही तिने भावुक पोस्ट शेयर केलीय. पिपींगमून मराठीने संपर्क साधल्यावर तेजस्विनीने सिंधुताईंसोबतच्या काही खास आठवणींना उजाळा दिलाय.
पडद्यावर सिंधुताई साकारणाऱ्या तेजस्विनीने या चित्रपटाच्या निमित्ताने बराच काळ सिंधुताईंसोबत घालवला होता. मात्र त्याकाळी सोशल मिडीया आणि कॅमेरा मोबाईल नसल्याने खूप गोष्टी टीपायच्या राहुन गेल्याचं पिपींगमून मराठीशी बोलताना तिने सांगितलं.
तेजस्विनी म्हणते की, “अनंत सरांनी तर मला पहिल्यांदाच बघुनच रिजेक्ट केलं होतं. मला आठवतय की पहिल्यांदा जेव्हा मला माई भेटल्या होत्या तेव्हा त्या म्हटल्या होत्या की ही करणार आहे माझी भूमिका ? त्यांची उद्गारवाचक प्रतिक्रिया होती. पण पहिल्या दिवशी त्या सेटवर आल्या होत्या. आणि मी त्यांच्या गेटअपमध्ये जेव्हा समोर आले तेव्हा त्यांनी मला जवळ घेतलं. माझ्या गालाची पापी घेतली आणि म्हटल्या की आता तू दिसतेयस...”
तेजस्विनी पुढे सांगते की, “त्यांच्यावरती चित्रपट झाला याच्यातून त्यांमध्ये काही फरक पडला नाही. या चित्रपटामुळे त्या जे कार्य करतायत यामध्ये खूप हातभार लागला. या चित्रपटामुळे त्यांचं कार्य सातासमुद्रापार गेलं. तर चित्रपटाने कित्येक अवॉर्ड घेतले होते.”
‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटाने तेजस्विनीचं आयुष्य कसं बदललं तेही तिने यावेळी सांगितलं. “एका माणसाच्या आयुष्यामुळे अनेक आयुष्य बदलतात. तसं माझ्या बाबतीत झालय. हे त्यांना माहितीही नसावं की त्यांच्यामुळे एका अभिनेत्रीला ओळख मिळालीय. तिच्याकडे अभिनेत्री म्हणून बघण्याचा दृष्टीकोन बदलला. पण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि माझ्या आयुष्यात खूप बदल करून गेलं.” सिंधुताईंसोबतच्या भेटीगाठीविषयी तेजस्विनी सांगते की, “आम्ही रोज संपर्कात नव्हतो. काही कार्यक्रमांमध्ये भेटलो असू. पण त्यांच्यापेक्षा मी ममता ताईंच्या संपर्कात होते. पण माईंशी माझं खूप काळ बोलणं झालं नाही. मी कलाकार म्हणून माझं काम करून मोकळे झाले होते.”
सिंधुताई यांचं भाषणं, त्यांचं बोलणं हे प्रेरणादायी होतं. याविषयी बोलताना तेजस्विनी त्यांच्या बिनधास्त बोलण्याचा उल्लेख करते. ती म्हणते की, “त्यांच्या जिभेवर सरस्वती होती. त्यांना कधी विचार करावा लागायचं नाही. त्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात जरी गेल्या तरी बिनधास्त बोलायच्या. त्याचं कुणाला वाईटही वाटायचे नाही किंवा कुणी आक्षेपही घेत नसायचे, शेवटी त्या आई होत्या. कित्येक वेळा मी त्यांची राजकीय भाषणं ऐकली आहेत. त्यांच्यावर बहीणाबाईंचा खूप प्रभाव होता. त्या इतक्या शिकलेल्या नव्हत्या पण बहीणाबाईंच्या कवितांचा परिणाम होता. एखादी स्त्री ही शिकलेली नाही आणि आपलं मत एक मंचावर परखडपणे मांडते हे धाडस कुणामध्येतरी असणं याच्यासाठी खूप ध्यैर्य़ लागतं आणि तेही त्यांनी कुठल्या काळात केलय हे महत्त्वाचं होतं.”