PeepingMoon Exclusive : अशी आहे सुयश आणि आयुषीची लव्हस्टोरी... म्हणून घेतला होता लग्न करण्याचा निर्णय

By  
on  

मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक नवविवाहीत जोडपी त्यांची पहिली मकर संक्रांती साजरी करत आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे टिळक ही जोडी. मागील वर्षी 21 ऑक्टोबर 2021 रोजी या दोघांनी लगीनगाठ बांधली होती. त्याआधी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन दोघांनी सोशल मिडीयावर त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला होता. याच सुंदर कपलसोबत पिपींगमून मराठीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने गप्पा मारल्या आहेत. या नात्याची सुरुवात कशी झाली याविषयी या दोघांनी सांगितलंय.

या नात्याच्या सुरुवातीविषयी आयुषी सांगते की, “सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या पुढे जात गेल्या आणि त्या आम्हा दोघांनाही बरोबर वाटत होत्या. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी सुयशला ओळखत नव्हते. त्यानंतर सुयश आणि मी सोशल मिडीयावर बोलायला सुरुवात केली. एके दिवशी भेटलो आणि ठरवलं की काही वेळ एकत्र घालवुन बघुया. भेटल्यानंतर मात्र आम्ही सलग दहा ते पंधरा दिवस भेटत होतो. आम्हाला दोघांनाही खूप वेळ एकत्र घालवायचा आहे असं वाटायला लागलं. हा विचार पुढे जात मग आम्ही साखरपुडा केला आणि मग लग्नही केलं.”

सुयशनेही या नात्याविषयी सांगताना पहिल्या भेटीचा उल्लेख केलाय. तो सांगतो की, “मी श्रावण क्वीन कार्यक्रमाच्या मंचावर तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. तिला जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्यासाठी तिच विनर होती. मला तेव्हा वाटलं की ही फारच कमाल आहे. तेव्हा मी तिच्याशी बोललो होतो आणि तिचं अभिनंदनही केलं होतं. जेव्हा मी तिला सोशल मिडीयावर फॉलो करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की ही मुलगी कमाल आहे, उत्तम डान्सर आहे, स्वत:ला खूप चांगलं कॅरी करते. त्यामुळे मला ही मुलगी कशी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. मला कुणी असं टॅलेंटेड व्यक्ति दिसलं की मी माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतो. मग काही कास्टिंगसाठी मी आयुषीचं नाव सुचवलं होतं. त्यादरम्यान तिच्याशी बोलणं व्हायचं. तेव्हा असं लक्षात आलं की हिची स्वप्नं आणि पॅशन मोठ्या प्रमाणात डान्स आणि अभिनयाकडे आहेत. ही इतर काही मुलींसारखी नाही, फक्त ग्लॅमर आणि फेमस होण्याच्या दृष्टीने ती याच्याकडे बघत नाही. कुठेतरी तिला पहिल्यांदाच बघीतलं तेव्हा ती मनात भरली. जेव्हा मी माझ्याकडून सांगितलं तेव्हा लगेच तयारी नव्हती तिची. मात्र पुढे आमच्या दोघांची तयारी झाल्यानंतर मग घरच्यांना सांगितलं. काही गोष्टी तुमच्या नशीबात काहीवेळेला लिहीलेल्या असतात त्या होतातच आणि त्या तशा पद्धतिने होऊ द्यायच्या असतात. हेच आमच्या बाबतीत झालं असं वाटतं. आणि त्यानंतर चांगल्या पद्धतिने आमचा लग्नसोहळाही पार पडला.”

सुयशने आत्तापर्यंत विविध मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलय. तर हिंदीतही त्याने त्याच्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण केलीय. तर आयुषीने ब्युटी कॉन्टेस्ट आणि डान्स रिएलिटी शोमधून तिचं नृत्यकौशल्य समोर आणलय. आगामी काळात आयुषीदेखील विविध चित्रपटांमधून समोर येणार असल्याचं यावेळी सुयश म्हटला. शिवाय दोघांना एकत्र काम करण्याची इच्छा असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.
 

 

Recommended

Loading...
Share