नुकतच बिग बॉस मराठीचे तिसरं सिझन संपलय. विशाल निकम हा तिसर्या सिझनचा विजेता ठरला. मात्र प्रेक्षकांना आत्तापासूनच आगामी सिझनची उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीचे तिनही सिझन त्यातील स्पर्धकांमुळे तर गाजलेच मात्र एका व्यक्तिमुळे हे तिनही सिझन लक्षवेधी ठरले ती व्यक्ति म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्यामुळे.
तिनही सिझनच्या यशस्वी वाटचालीनंतर आगामी सिझनसाठी महेश मांजरेकर सूत्रसंचालन करतील की नाही हा प्रश्न आता समोर आलाय. महेश मांजरेकर यांनी पिपींगमून मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बिग बॉस मराठीचं आगामी सिझन आणि त्यांच्या सुत्रसंचालनाविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केलाय. यावेळी त्यांनी बिग बॉस मराठी कार्यक्रमासोबतचा त्यांचा तीन वर्षांचा करार संपल्याची माहिती दिलीय.
महेश मांजरेकर म्हणतात की, “मला तीन वर्षे काम करताना मजा आली. पण माझा होस्ट करण्याचा तीन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि आता तो संपलाय. ही तीन वर्षे मला होस्टिंग करायला मजा आली. आता कोण होस्ट करतय ते बघुयात म्हणजे तुमच्या बरोबर मी पण हा कार्यक्रम बघीन. अजून खूप लोकं आहेत चांगलं सूत्रसंचालन करणारी. मला पुन्हा बोलावलं तरी आनंद होईल आणि नाही बोलावलं तरी. पण बिग बॉस मराठीच्या टीमने मला तीन वर्षे खूप साथ दिली आणि सपोर्ट केलं.”
प्रेक्षकांना महेश मांजरेकरांनी केलेलं सूत्रसंचालन आवडलं आणि तिनही वर्षे त्यांनी या कार्यक्रमाची धुरा उत्तमरित्या सांभाळली होती. तेव्हा बिग बॉस मराठीच्या आगामी सिझनचं सूत्रसंचालन कोण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय.