गासम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हळहळतोय. अनेक गायक - गायकांना लता दीदींसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यापैकीच एक म्हणजे सुदेश भोसले. सुदेश भोसले यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत अनेक लाईव्ह शोज केले होते. लता दीदींच्या निधनाची बातमी म्हणजे आज आयुष्यातला फार वाईट दिवस असं ते म्हणतात. पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
सुदेश भोसले म्हणतात की, "आज आयुष्यातला फार वाईट दिवस आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी बऱ्याच आहेत. अनेक कार्यक्रम केले होते मी लता दीदींसोबत.अनेक वेळा लतादीदींची भेट झाली होती. त्यांचं गाणं ऐकूनचा आम्ही गायला लागलो होतो, गाणं शिकायला लागलो होतो. आजही रियाज करायचा असेल तर आम्ही दीदींची गाणी ऐकून रियाज करतो. माझ्यासारख्या नवीन येणाऱ्या बऱ्याच गायक गायिकांसाठी ही धक्कादायक बातमी आहे. बरेच झटके सहन केले आयुष्यात पण हा जो धक्का आहे तो संपूर्ण देशाला आणि संगीत क्षेत्रासाठी आहे."
लता दीदींच्या वाढदिवसाला सुदेश भोसले यांनी मागील वर्षी केलेला कॉल हा त्यांच्यासाठी लता दीदींसोबतचा शेवटचा कॉल ठरला. यावेळी लतादीदींनी त्यांच्याविषयी विचारपुस केली होती. सुदेश भोसले सांगतात की, "मोठी आठवण म्हणजे 28 सप्टेंबरला मी त्यांच्या वाढदिवसाला फोन केला होता. की दीदी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि इथूनच तुमच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घेतो म्हणून. मग त्या म्हटल्या की तुमचं कसं चाललय. मी म्हटलं दीदी बरं चाललय. मग त्या पुढे म्हटल्या की दोन अडीच वर्ष सगळं बंद आहे ना म्हणून विचारलं मी कसं चाललय. कसं ठीक चाललय का तुमचं.. काम वैगेर ठीक सुरु आहे ना काय असेल तर सांगा.. म्हणजे वाढदिवसाला फोन केला आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला. हे त्यांच्यासोबतच माझं शेवटच संभाषण."
लता दीदींसोबतच्या विविध लाईव्ह कार्यक्रमाच्या आठवणी सांगताना सुदेश भोसले म्हणतात की, "कुणी असं उगाचच मोठं होत नाही. कोणताही कार्यक्रम असेल तर त्या मुंबईत बऱ्याच रिहर्सल करायच्या सगळ्यांना बोलावुन. त्यांनी हजारो वेळा गायलेली गाण्याचही त्या रिहर्सल करायच्या. आपली जी कला आहे त्याचा सन्मान करणं हे त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्या चाहत्यांविषयी त्यांना आदर असायचा. स्टेजवर कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, याची त्या काळजी घ्यायच्या. माझ्यासारख्या नवीन लहान कलाकाराला त्या प्रोत्साहन द्यायच्या. मी काही वेगळे आवाज काढले तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून यायचं की किती वेळा त्यांना आवडतं हे. त्यांनी अनेकदा मुलाखतीत सांगितलय की कार्यक्रमात भोसले असले की मला दुसऱ्या मेल सिंगरची गरज नाही म्हणून. नवीन कलाकारांना त्या फार सांभाळून घ्यायच्या."
लता दीदींनाही जोक करायला आणि नक्कल करायला आवडायची असल्याचं सुदेश भोसले यावेळ म्हणाले. ते सांगतात की, "मी स्वताला भाग्यवान समजतो की त्यांनी मला कार्यक्रमांमध्ये बोलावले. लता मंगेशकर या मला नावाने ओळखतात यापेक्षा मोठी भावना काय असेल. कार्यक्रमांमध्ये त्या स्वत: कधी कधी माईक मध्ये बोलायच्या जेव्हा मी आवाज काढायचो त्या म्हणायच्या वाह क्या बात है. हे प्रोत्साहन म्हणजे मोठ्यात मोठ्या पुरस्काराला लाजवतील असे होते. त्यांच्यासोबत अनेक गप्पा गोष्टी देखील करायचो. त्या शांत आहेत असं म्हणायचे सगळे पण त्यांनाही जोक करायला आवडायचे, नकला करायला आवडायच्या. त्या पण हसत खेळत गंमत करायच्या."
लता दीदींच्या जाण्यानं संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. एक गायक म्हणून सुदेश भोसले त्यांच्या भावना व्यक्त करताना म्हणतात की, "आज असं वाटतय स्वर बंद पडले. त्यांची जी गाणी आहेत त्यामुळे आजही पुढे अनेक शंभर वर्षे ती गाणी प्रेरणा देत राहतील. त्यांचा आवाज कायम प्रोत्साहन देत राहील. आता असं वाटतय की सगळं संपलं. चांगलं गाणं काय हे दीदींनी कायम दाखवल. बरेच आले बरेच गेले पण ते स्थान कुणी घेऊ शकत नाही, दीदींनाच परत यावं लागेल."