PeepingMoon Exclusive : बच्चन सरांसोबत काम केलं हा माझ्या आयुष्याच्या कहाणीतला क्लायमॅक्स असेल - नागराज मंजुळे 

By  
on  

येत्या 4 मार्च रोजी 'झुंड' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. प्रसिद्ध लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा पहिला हिंदी चित्रपट असून बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमूनने नागराज यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीय. यावेळी नागराज यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितलाय.

नागराज मंजुळे म्हणतात की, "बच्चन सरांनी माझ्यासोबत काम केलं हेच माझ्यासाठी त्यांनी केलेलं कौतुक. यापेक्षा मोठं काहीच मिळू शकत नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हा बच्चन सरांचे चित्रपट पाहण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा पासून आत्तापर्यंत बघीतलं तर  मी चित्रपट बनवतो आणि आता बच्चन सरांसोबत काम करतोय. त्यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी तर ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवीन."

याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा स्वप्नवत होता हे देखील त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की, "माझ्यावर जर कहाणी लिहीण्यात आली तर त्यात माझ्याकडे पैसे नाहीत अशी सुरुवात होऊ शकते पण मी बच्चन सरांसोबत काम केलं हे त्या कहाणीचा क्लायमॅक्स असू शकतं. माझ्यासोबत त्यांनी काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आमची काम करण्याची पद्धत अनौपचारिक आहे. मुंबईच्या झगमगाटापासून दूर काम करण्याची आमची पद्धत आहे. पण बच्चन सरांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण जाणवू दिला नाही. त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. कोणत्या चूकाही झाल्या असतील तर त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.  हा चित्रपट झाला हे स्वप्न वाटतय, खरं वाटत नाहीय."

याशिवाय आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शनही नागराज मंजुळे करणार आहेत. महागाथा असं या चित्रपटाचं नाव असून अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटात झळकणार आहे. तर अजय - अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभेल. या चित्रपटाविषयी सांगाताना नागराज म्हटले की, "लॉकडाऊन आणि कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी पुढे ढकलल्या गेल्यात. मी तो चित्रपटही घेऊन येईल. ती खूप मोठी जबाबदारी आहे. लवकरच त्या चित्रपटाचही काम सुरु करु."

 

Recommended

Loading...
Share