केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘तू तू मी मी’ हे नाटक सिनेमॅटीक ढंगात नुकतंच रंगमंचावर अवतरलं आहे. सुपरस्टार भरत जाधव यात परत परत पाहायला मिळतायत. भरत जाधव या नाटकात तब्बल 14 विविध भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
दोन मिस मॅच जोडप्यांची ही कहाणी आहे. ह्यातल्या जोड्या लग्नापूर्वी एकमेकांच्या नवरा-बायकोवर प्रेम करत असतात, परंतु काही कारणास्तव मिस मॅच जोडीदाराशी त्यांना लग्नगाठ बांधावी लागते. पण जेव्हा ते एकमेकांसमोर येतात तेव्हा काय धम्मल घडते हे या अनुभवता येणार आहे.
याच नाटकाच्या निमित्ताने सुपरस्टार भरत जाधव यांच्यी पिपींगमून मराठीने खास बातचित केली. यावेळी कलाकारांच्या नव्या फळी सोबत काम करण्याविषयी भरत जाधव यांना विचारले असता, ते म्हणाले “ या नाटकाच्या निमित्ताने मी चांगल्या कलाकारांसोबत काम करतोय…पण अशी काही लोकं असतात जी म्हणतात, आपण नाटक करुन बघूया..मला नाटक करायचंय..असं म्हणतात पण मग मालिका आहे सिनेमा आहे किंवा इतर काम सुरू केलंय म्हणून नाटकाचे प्रयोग अर्धवट सोडतात. पण हे अयोग्य आहे. एका नाटकापाठी खुप मी यंत्रणा काम करत असते. त्यांचं नुकसान होतं. पूर्ण टीम तुमच्यावर अवलंबून असते. प्रयोगसंख्या तुमच्यावर अवलंबून असते. त्यामुळे दुस-या कामांसाठी नाटकाला टांग देणारी लोकं मला माझ्यासोबत नको होती. नाटकासाठी खुप मोठं योगदान लागतं. त्यासाठी मोठी ऊर्जा लागते. नुसतं नाटक करायंचंय असं बोलून होत नाही.”
'तू तू मी मी’ या नाटकात कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, ऐश्वर्या शिंदे, रुचिरा जाधव आणि भरत जाधव हे कलाकार धम्माल उडवून देणार आहेत. येत्या 7 एप्रिल पासून हे नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे.