अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमात सावित्रीबाई मालुसरे ही शिवरायांच्या मर्द मराठा शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारतेय हे आपण सर्वच जाणतो. या सिनेमातील तिचा लुक सोशल मिडीयावरुन सर्वांसमोर आला. यात मराठमोळ्या साज लेवून उभी असलेली काजोल पाहताच क्षणी प्रेक्षकांना भावली.
नऊवारी साडी, डोक्यावर पदर, गळ्यात दोडलं, ठसठसशीत कानातले, कपाळावर गडद कुंकू आणि नाकात भलीमोठी नथ अशा सावित्रीबाईंच्या रुपातील काजोल अगदी उठून दिसली. पिपींगमून मराठीसोबत एक्सक्ल्युझिव बातचित करताना काजोलने आपल्या नऊवारी नेसण्याच्या अनुभवाविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या.
काजोल सांगते, "40-50 वर्षांपासून सिने इंडस्ट्रीत नऊवारी साडी नेसविणा-या प्रचंड अनुभवी बाई मला साडी नेसवायच्या. ब्लॅक आणि व्हाईटच्या काळापासून त्या हेच काम करत आहेत आणि त्यात त्या खुप म्हणजे खुपच पारंगत आहेत.सर्वांना सिनेमासाठी किंवा लावणींच्या गाण्यांसाठी नऊवारी नेसवणं हेच त्यांचं काम आहे. "
नऊवारी नेसण्याविषयी काजोल उत्साहात पुढे सांगते, "मला सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी नऊवारी नेसायलाच फक्त अर्धा तास लागायचा. प्रत्येक घडी-पदर, या त्या निष्णात असल्याने सारख्या तपासून घ्यायच्या आणि त्यांच्या ओके नंतर मग पुढचा साजश्रुंगार असायचा, मी त्यांना नेहमी सांगायची की मला पण शिकायची आहे नऊवारी नेसायला व मी प्रयत्न पण करायची पण व्यर्थच. नऊवारी नेसणं खुपचं कठीण काम आहे. हमसेंं तो ना हो पाए"
ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी: द अनसंग वॉरियर' मध्ये अजय देवगण, सैफ अली खानसह अभिनेत्री काजोल सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.