बॉलिवुडची सुपरस्टार आणि सौंदर्यवती माधुरी दीक्षित नेने मराठी सिनेमात कधी झळकेल याची सगळेच वाट पाहत होते. ‘बकेटलिस्ट’ या 2018 मध्ये आलेल्या मराठी सिनेमातून माधुरीने मराठीत पदार्पण केलं. त्यानंतर माधुरी आणि श्रीराम नेने प्रोडक्शन निर्मित असलेल्या ‘15 ऑगस्ट’ हा मराठी सिनेमा माधुरी ओटीटीवर घेऊन आली. माधुरीने मराठीत काम केलं, त्यानंतर मराठी सिनेमाची निर्मिती केली. एवढ्यातच माधुरी थांबली नाही तर तिने आणखी एक मराठी सिनेमा घेऊन येण्याचं ठरवलं. ‘पंचक’ हा मयराठी सिनेमा घेऊन येत असल्याची घोषणा माधुरीने मागील वर्षी केली. आणि याच सिनेमाविषयी माधुरीने पिपींगमूनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगीतलं. या सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालेलं आहे, मात्र या सिनेमाचं फायनल टचअप बाकी असल्याने लॉकडाउनमुळे या सिनेमाचं हे काम सध्या रखडलं असल्याचं माधुरी म्हटली आहे.
माधुरी याविषयी म्हणते की, “या सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालय, पण लॉकडाउनमुळे पोस्ट प्रोडक्शनचं काम थोडं राहिलं होतं. एकदा लॉकडाउन संपलं की त्यानंतर फिनीशिंग देऊन ती फिल्म रिलीज करायची आमची इच्छा आहे. पण आता ते कसं?, काय? आणि कधी ? हे सगळं अजून ठरवता येत नाही, जोपर्यंत काही प्लॅन बनत नाही.”
तेव्हा माधुरीचा हा सिनेमा येण्यासाठी लॉकडाउन संपण्याची वाट पाहावी लागणार एवढं नक्की. माधुरी आणि श्रीराम नेने प्रोडक्शनचा ‘15 ऑगस्ट’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. मात्र त्यातच ‘पंचक’च्या प्रदर्शनात काही बदल झाले किंवा लॉकडाउन वाढल्यास लॉकडाउनमध्येही हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यताही आता नाकारता येत नाही.
‘पंचक’ या मराठी सिनेमाची महत्त्वाची बाजू म्हणजे सिनेमात झळकणार असलेले उत्तम आणि अनुभवी कलाकार. अभिनेता आदिनाथ कोठारे यात मुख्य भूमिकेत आहे. दिग्दर्शक जयंत जठार या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, सतिश आळेकर, विद्याधर जोशी, दीप्ती देवी हे कलाकार यात झळकणार आहेत.