By  
on  

Exclusive : "निशिकांतच्या जाण्यानं माझं आणि इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान", डोंबिवली फास्ट'मधील अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या भावना

मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी हैदराबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून यकृताच्या आजाराने त्यांना ग्रासलं होतं. मृत्यूशी झुंज देत असताना त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

निशिकांत कामत यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. 'डोंबिवली फास्ट' या मराठी सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. याच सिनेमातील अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी पिपींगमून मराठीशी बोलताना निशिकांत कामत यांच्या जाण्यानं खूप नुकसान झालं असल्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. संदीप कुलकर्णी म्हणतात की, "माझं खूप मोठं नुकसान आहे. तो जेव्हा दिग्दर्शक असं फिल्मला नाव लागण्याआधीपासूनची आमची मैत्री आहे. डोंबिवली फास्टच्या आधीपासून आमची मैत्री आहे. तो अत्यंत टॅलेंटेड लेखक, दिग्दर्शक, एडिटर होता. बॉलिवुडमध्येही यश मिळालं होतं त्याला.. मात्र अचानक असं नियतीने केल्यामुळे हे खूप मोठं नुकसान आहे. त्याच्या जाण्यानं मलातर नुकसान आहेच पण इंडस्ट्रीचं पण मोठं नुकसान आहे.याआधी मध्ये एकदा तो बरा होऊन आला होता तेव्हा त्याच्याशी भेट झाली होती. तो व्यवस्थित होता तेव्हा आणि कामालाही लागला होता."

निशिकांत कामत यांच्या दिग्दर्शन पदार्पणातील पहिल्याच सिनेमात त्यांना प्रचंड यश मिळालं होतं. 2006 मध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. शिवाय विविध पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाच्या टीमचा आणि निशिकांत कामत यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. 

निशिकांत कामत यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. शिवाय त्यांच्यासोबत काम केलेले कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive