Exclusive: काजोल म्हणते मी आहे,अजयची टिचर; ‘तानाजी’साठी देतेय मराठीचे धडे

By  
on  

बॉलिवूडमधील सुपरकूल कपल म्हणजे काजोल आणि अजय देवगण.ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबरोबरच दोघांचही ख-या आयुष्यातलं नातंसुध्दा एकदम बेस्टफ्रेंडसारखं घट्ट आहे.दोघंही नेहमीच एकमेकांच्या साथीने करिअर आणि कुटुंबाची धुरा सांभाळताना दिसतात. त्यांच्या नात्याचे अनेक दाखले नेहमीच इंडस्ट्रीमध्ये दिले जातात. मराठी पिपींगमून डॉट कॉमने नुकतीच एक्सक्ल्युझिव्हरित्या काजोलची भेट घेतली. या भेटीदरम्यान काजोलने मनसोक्त गप्पा मारल्या आणि प्रश्नांवर दिलखुलास उत्तरं देखील दिली आणि तिसुध्दा चक्क मराठीमध्ये.

अजय देवगण ‘तानाजी –द अनसंग वॉरियर’ या दमदार सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर योध्दे तानाजी यांची महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा अजय सिनेमात साकारणार असून या मराठमोळ्या भूमिकेसाठी पत्नी काजोल त्याला मदत करतेय, हे खुद्द तिनेच आम्हाला सांगितलं आहे.

काजोल खळखळून हसून म्हणते,“ नक्कीच मराठी भाषेसाठी मीच त्याची टिचर आहे. सिंघम सिनेमातल्या भूमिकेसाठी मीच त्याला मराठी शिकवलं होतं. आता माझी सटकली... हा संवाद आठवतो आहे, ना मीच शिकवला आहे. त्याला मी नेहमी मराठी भाषेसाठी प्रोत्साहीत करत  असते. आगामी ‘तानाजी’ सिनेमासाठी मराठी भाषेचे धडे तो माझ्याकडूनच गिरवतोय.”

काजोल याबाबत पुढे सांगते, “मी अजयच्या मदतीसाठी नेहमीच तयार असते. पण प्रत्येक सिनेमातील त्याच्या यशस्वी व्यक्तिरेखेसाठी दिग्दर्शकाचीसुध्दा तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका असते. ज्याप्रमाणे कथानकाची गरज असते तशी व्यक्तिरेखा त्याला खुलवावी लागते. दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार अजयला त्याप्रमाणे संवाद आणि उच्चारावर मेहनत घ्यावी लागते. मी त्याला जिथे आवश्यक आहे, तिथे मराठीसाठी मदत करते. आता माझी सटकली, हा त्याचा संवाद प्रचंड लोकप्रिय ठरला. म्हणूनच तुम्ही मला त्याची मराठी गुरू म्हणू शकता.”

अजय देवगणला मराठी सिनेमांचे नेहमीच अप्रूप वाटते, हे आपण जाणतोच. त्याने ‘विटी-दांडू’ या मराठी सिनेमाचीसुध्दा निर्मिती केली आहे. तर ‘लोकमान्य’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करणारा मराठमोळा ओम राऊत अजयच्या ‘तानाजी –द अनसंग वॉरियर’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतो आहे. प्रेक्षकांनासुध्दा अजयच्या या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share