बॉलिवूडमध्ये जणू काही #MeToo नावाचं वादळच आलं आहे. या वादळात अनेक कलाकारांचे खरे चेहरे समोर येत असल्याचं बोललं जात आहे. पण जिच्यापासून या वादळाची सुरुवात झाली त्या तनुश्री दत्ताच्या आरोपांचा फटका आता नाना पाटेकरांच्या सिनेकारकिर्दीलासुध्दा बसताना दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नानांना आता ‘हाऊसफुल 4’ सिनेमावर पाणी सोडावं लागणार आहे.
हाऊसफुल या सुपरहिट कॉमेडी सिरीजच्या या 4 थ्या भागाचे चित्रीकरण सध्या सुरु असून सिनेमात महत्त्वाची भूमिका असणारे नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आपण या दोघांसोबत काम करणार नाही अशी भूमिका सुपरस्टार अक्षय कुमारने घेतली आहे.
अक्षय कुमार या संपूर्ण #MeToo मोहिमेबद्दल बोलताना म्हणाला, “मी ‘हाऊसफुल 4’च्या निर्मात्यांना चित्रिकरण थांबवण्याची विनंती केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, पुढील तपास पूर्ण होईपर्यंत कृपया चित्रिकरण सुरु करायला नको. मी कोणत्याही दोषींसोबत काम करणार नाही. लैंगिक शोषणाचे आरोप करणा-या महिंलाचे संपूर्ण ऐकून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांना न्याय मिळायलाच हवा.” इटलीतून भारतात परतल्यानंतर अक्षयने आपलं हे मत व्यक्त केलं.
दरम्यान ‘हाऊसफुल 4’चे निर्माते साजिद नाडियाडवाला यांचे या संपूर्ण प्रकरणामुळे प्रचंड नुकसान होताना दिसून येत आहे.