अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय अभिनेता! 'फोर्ब्स' च्या यादीत पटकावलं स्थान

By  
on  

बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार सध्याचा सर्वाधिक व्यस्त आणि आघाडीचा कलाकार आहे. नुकतंच अक्षयने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 'फोर्ब्स' मॅगझीनने नुकतीच जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे.

बॉलिवूडच्या तिन्ही खानांना मात देत अक्षयने या यादीत 33 वे स्थान मिळवले आहे. अक्षयसोबत या यादीत रिहाना, स्कारलेट जॉन्सन, क्रिस इवन्स, केटी पेरी, ब्रेडली कूपर, जॅकी चॅन आणि लेडी गागा या हॉलिवूड स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. गतवर्षी या यादीत 40.5 मिलियन डॉलरची कमाईसह अक्षय 76 व्या स्थानावर होता. यावर्षी त्याने 33 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

 

'फोर्ब्स'च्या या यादीत गायिका टेलर शिफ्ट अव्वल स्थानी आहे.  फोर्ब्सची ही यादी सेलिब्रिटींचे वर्षभरातील उत्पन्न आणि त्यांची प्रसिद्धी यावरून आखण्यात येते. अक्षयची सध्याची कमाई 65 मिलियन डॉलर एवढी आहे. अक्षय लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्यु. च्या एक क्रमांक खाली आहे. 

अक्षय सध्या 'सूर्यवंशी' आणि 'मिशन मंगल' या दोन सिनेमांमध्ये झळकत असून 'मिशन मंगल' यावर्षी 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. तर 'सूर्यवंशी' 27 मार्च 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय अक्षय साऊथचा सुपरहिट सिनेमा ‘कंचना’चा  हिंदी रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्येही झळकणार आहे. ‘गुड न्यूज’ आणि ‘हाऊसफुल 4’ या आगामी सिनेमांची सुद्धा अक्षयने घोषणा केली आहे. यावरूनच 'फोर्ब्स' च्या अधिक अक्षयची झालेली प्रगती पाहून सर्व बॉलीवूडप्रेमींच्या आणि अक्षयच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share