करोना संकटामुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. पण अभिनेता सुव्रत जोशीनं नुकताच एक क्रेझी अनुभव घेतला. लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाचं त्याचं राहिलेलं डबिंग त्यानं चक्क लंडनमध्ये पूर्ण केलं. गंमत म्हणजे या डबिंगवेळी दिग्दर्शक शंतनू रोडे 'झूम'द्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे, तर लंडनमधील डबिंग स्टुडिओतील तंत्रज्ञ बांगलादेश आणि पोलंडचे होते.
प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्सनं, लेकसाईड प्रोडक्शन ने 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
"गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचं चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झालं होतं. शासनाने अनलॉकिंग सुरू केल्यावर चित्रपटाच्या डबिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार बाकी सर्व कलाकारांचं डबिंग पूर्ण झालं. मात्र सुव्रत लंडनमध्ये अडकल्यानं त्याला मुंबईत येऊन डबिंग करणं शक्य नव्हतं. अखेर तंत्रज्ञानामुळे या अडचणींवर मार्ग निघाला असे चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.
लंडनमध्ये डबिंग करण्याविषयी सुव्रत म्हणाला, की माझ्या नाटकाच्या दौऱ्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. पण करोना संसर्गामुळे दौरा स्थगित करावा लागल्यानं मी लंडनला गेलो. त्यामुळे माझं गोष्ट एका पैठणी चित्रपटाचं डबिंग करता येत नव्हतं. निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी धाडसी निर्णय घेऊन मला लंडनमध्ये डबिंग करायला सांगितलं. त्यानुसार लंडनमध्ये एक स्टुडिओ शोधला आणि डबिंग पूर्ण केलं. या डबिंगसाठी दिग्दर्शक शंतनू रोडे झूमद्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे. पण स्टुडिओतल्या तंत्रज्ञांपैकी एक जण बांगलादेशातील आणि एक जण पोलंडमधील होते. त्यांना मराठी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येत होता. पण त्यातूनही डबिंग उत्तम पद्धतीने झाले हा अनुभव खरोखरच क्रेझी होता.