चेतन गरुड प्रॉडक्शन्सच्या सुसाट रोमॅंटिक अल्बम्सच्या खजिन्यातलं आणखी एक रत्न नव्याने आपल्या भेटीस आले आहे. तरुणांच्या हृदयाचे ठोके अचूक जाणणारे निर्माते चेतन गरुड सध्या एक रोमँटिक सॉंग घेऊन आले आहेत. नव्या पिढीच्या आणि नव्या नव्या प्रेमात रंगून गेलेल्या अशा तरुणाईवर तुला पाहून जरा' असे हे गाणे आहे. प्रेयसीची स्तुती करत, प्रत्येक प्रियकराची अवस्था ही 'तुला पाहून जरा, तुला हेरून जरा, सुटतोय मनाचा ताबा' अशीच काहीशी होत असते. नेमके हेच हेरत 'तुला पाहून जरा' हे गाणे मनाने तरुण असणाऱ्या साऱ्यांनाच आवडेल असे आहे. चेतन गरुड प्रोडक्शन प्रस्तुत 'तुला पाहून जरा'चे युथफूल दिग्दर्शन चेतन महाजन आणि राहुल जी यांनी केले आहे.
'तुला पाहून जरा' हे गाणे म्हणजे तरुणाईचा जल्लोष असून हा जल्लोष वैष्णवी पाटील आणि अक्षय करडे यांच्या मस्तीभऱ्या केमिस्ट्रीने रसिकांच्या मनावर गारुड घालण्यासाठी सज्ज आहे. वैष्णवी आणि अक्षयची रोमॅंटिक केमिस्ट्री जमून येण्यात या गीतातील बोल आणि संगीताचा मोठा वाटा आहे. मने जुळवणारे 'तुला पाहून जरा' या गाण्याचे बोल नितीन कुटे लिखित असून त्यांनीच आपल्या सुरेल आवाजाने स्वरसाज चढवला आहे. शिवाय संगीताची बेजोड साथ दिलीये ती म्हणजे संगीतकार अमोल दाते आणि नितीन कुटे यांनी. या गाण्याचे संकलन प्रदुमना सावंत याने केले असून गाण्याचे सुंदर चित्रीकरण रवी उच्चे यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहे. चेतन गरुड प्रोडक्शन्सची खासियत म्हणजे सुंदर लोकेशन्स, होतकरू कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि उत्तम टेक्निशियन्सची किमया हे गणित ठरलेले.
'खंडेराया झाली माझी दैना' या यशस्वी सोलो अल्बमनंतर चेतन गरुड यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक गाणी त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बनवली. त्यांच्या गाण्यांना रसिकांनी आपल्या पसंतीची पोचपावती दिली असून चेतन गरुड प्रोडक्शन प्रस्तुत आगामी 'तुला पाहून जरा' या गाण्यालासुद्धा प्रेक्षक डोक्यावर घेतील अशी आशा आहे.