सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत काळ झपाट्याने 7 वर्षे पुढे सरकलेला दाखवण्यात येणार आहे आणि प्रेक्षक आता युवा अध्याय पाहणार आहेत. या लीपनंतर अहिल्याबाईंच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण अध्याय उलगडणार आहे. स्वतःचा मार्ग शोधताना सगळ्या प्रतिकूलतांवर मात करत आणि समाजातील अनिष्ट रूढींवर विजय मिळवत भारतीय इतिहासातील एका महान महिला शासक बनण्याच्या कीर्तीपर्यंतची अहिल्याबाईंची वाटचाल या मालिकेतून दिसणार आहे.
लोकप्रिय अभिनेत्री एतशा संझगिरी हिची तरुण अहिल्याबाई होळकरांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील तिची उत्कृष्ट कामगिरी आणि या काळात तिला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम विचारात घेता, मालिकेतील या महत्त्वाच्या भूमिकेसाठी तिची निवड अगदी चपखल आहे असे वाटते.
या मालिकेसाठी निवड झाल्याचा आपला आनंद व्यक्त करताना एतशा संझगिरी म्हणाली, “भारतीय इतिहासातील एक अत्यंत महान महिला शासक असलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा वारसा प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य मानते. पुण्यश्लोक अहिल्याबाई ही सध्या टेलिव्हिजनवरची प्रेक्षकांची अत्यंत लाडकी मालिका आहे आणि याचे श्रेय त्यातील उत्कृष्ट अभिनय आणि दमदार कथानकाला जाते. मला आशा आहे की, या प्रेरणामूर्ती असलेल्या स्त्रीचे चरित्र पडद्यावर उलगडून दाखवण्यात मी यशस्वी होईन आणि प्रेक्षक माझ्यावर प्रेमाचा आणि कौतुकाचा असाच वर्षाव करत राहतील. ही नवीन वाटचाल सुरू करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. खरोखर, माझे जणू स्वप्नच साकार झाले आहे!”
राणी अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील नवीन अध्याय सुरू होत आहे 16 ऑगस्ट पासून, तर बघायला विसरू नका, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ दर सोम-शुक्र रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर