देशावर अद्यापही कोरोना विषाणूचे सावट आहेच. त्यामुळे प्रत्येक सण, उत्सव साध्या पद्धतीनेच साजरे करावे लागत आहेत. असे असले तरी या काळातही गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद झळकत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी सार्वजनिक मंडळांमध्ये किंवा घरांमध्ये गणेशोत्सवाची ठराविक गाणी लावली जातात.
विशेष म्हणजे यातली काही गाणी अशी आहेत ज्यांची नवलाई तसूभरही कमी झालेली नाही. गणेशोत्सवाची चाहुल लागली की या सुमारास गणेशभक्तांसाठी दरवर्षी गणपतीवर रचलेली नवनवीन चालींची नव्या रचनेची गाणी चित्रपटसृष्टीतील नवे-जुने, नवोदित संगीतकार-गीतकार करीत असतात. असेच एक वेगळ्या धाटणीचे 'हे गणराया' बोल असलेले गाणे निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घेऊन आले आहेत. 'पीबीए म्युझिक'चे 'हे गणराया' हे गाणे ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यांत शंकाच नाही.
'हे गणराया' असे शब्द रचत गायक आदर्श शिंदे आणि गायिका श्रावणी महाजन यांनी हे गाणे सुमधुर आवाजात गायले आहे. तर या गाण्याचे बोल गीतकार संग्राम पाटील आणि मयुरेश शिंदे लिखित असून या गाण्याच्या संगीताची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही मयुरेशने उत्तमरीत्या पेलवली आहे. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून वैभव लोंढे यांनी गाण्याची सूत्रे सांभाळली. 'हे गणराया' अशी साद श्रीगणेशाला घालत निर्मात्यांनी या गाण्याची निर्मिती करून लाडक्या गणरायाचे गाणे संपूर्ण गणेशभक्तांच्या भेटीस घेऊन आले आहेत. अर्थात एक निर्माते म्हणून त्यांनी कसलीही कमतरता या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान होऊ दिली नाही. शिवाय आपले लाडके दैवत असल्याने मनोभावे त्यांनी या गाण्याची निर्मिती करून एक आशीर्वादच मिळविला आहे.
या गाण्याची शोभा वाढवण्यात आपल्या सर्वांच्या लाडक्या कलाकारांचा मोठा वाटा आहे. इन्स्टाग्रामवर अधिराज्य गाजवणाऱ्या अशा काही दमदार कलाकारांची साथ या गाण्यालाही मिळाली आहे. आरजे सुमित, अभि रोकडे, अनिकेत शिंदे, विवेक तलवार, निखिल वाघ, हर्षदा वाघ, विवेक केसरकर, दुर्वा साळोखे, श्वेता भारगुडे या सर्वांच्या नृत्याने या गाण्याला चारचाँद लागले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नुकताच या गाण्याचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला संपूर्ण गाण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात लागून राहिली आहे. ७ सप्टेंबर ला 'हे गणराया' हे गाणे 'पीबीए म्युझिक'वर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे नक्कीच बाजी मारेल यांत शंकाच नाही.