गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर स्वागतासाठी अनेक पद्धतीने तयारी करत असतो. मंडळातील थाट वेगळाच शिवाय घरातील गणपतीच्या कौतुकाची प्रत्येकाची पद्धत वेगळी. सध्या करोनामुळे कुटुंब एकत्र आहे. अशावेळी बाप्पांच्या आगमनाचा सुंदर दिवस बाप्पाचे भक्तीमय सिनेमे पाहून साजरा करायला हवा.
अष्टविनायक:
गणोशोत्सवात हा सिनेमा पाहिला नाही असे कमीच असतील. गणेशोत्सवात पाहिला जाणारा ऑलटाईम फेव्हरिट सिनेमा म्हणजे अष्ट विनायक. सचिन आणि वंदना पंडित यांची केमिस्ट्री असलेला हा सिनेमा यातील सुश्राव्य गाण्यांमुळे चांगलाच प्रसिद्धीस आला. आज किती वर्षं उलटली तरी या सिनेमाची जादू ओसरली नाही. या सिनेमाने प्रत्येकाच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
विश्वविनायक :
गणपती भक्तीचा अगाध महिमा सांगणारा हा सिनेमा. माधव अभ्यंकर, भार्गवी चिरमुले, अजिंक्य देव, नागेश भोसले यांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा आहे. गणपतीवरील श्रद्धा आणि विश्वास यांची सुरेख परिभाषा हा सिनेमा मांडतो.
धप्पा:
बाप्पाचं आणि लहान मुलांचं नातं वेगळं आहे. नेमकं हेच नातं धप्पा या सिनेमातून दाखवलं आहे. लॉकडाऊन पुर्वीच्या गणोशोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. पण या प्रकारांना हटके वळण मिळतं त्यावेळी मोठ्यांना लहान मुलं कशाप्रकारे जाणीव करून देतात हे या सिनेमात पाहायला मिळतं. गणेशोत्सवाचा प्रचलित अर्थ जणू या सिनेमाने पुन्हा एकदा उलगडून सांगितला आहे. या गणेशोत्सवात हा सिनेमा सहकुटुंब जरुर पाहा.
मोरया:
गणोशोत्सव हा सण प्रत्येक वयोगटासाठी आहे. वर्षभरात साठवलेल्या उर्जेला योग्य वाट देण्याचे दिवस म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवात लक्षवेधी ठरते ती मंडळातील गणपतीची आरास. गेली दोन वर्षं आपण या आनंदाला काही अंशी का होईना मुकलो आहोत. मंडळातील गणपतीचा थाट वेगळाच असतो. पण गणपती मंडळाच्या स्पर्धेसोबतच राजकारणालाही हटके रंग चढत जातो. पण या सगळ्याच्या मुळाशी असलेली गणपती बाप्पाबद्दलची भावना मात्र तशीच राहते. याच भावनेला मोरया सिनेमाने हात घातला आहे.
आप्पा आणि बाप्पा:
गणेशोत्सव हा सण प्रत्येकाचा आहे. या सणामुळे प्रत्येकाला मिळणारा आनंद गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद करत नाही. पण असं असलं तरी एक सामान्य मराठी माणूस गणेशोत्सवामध्ये आर्थिक बाबींमध्ये भरडला जातो. मोठ्या उत्सवापायी त्याला आर्थिक चणचण सहन करावी लागते. अशा वेळी खुद्द बाप्पाच त्याच्या भेटीला आल्यावर काय काय धमाल उडते ही या सिनेमामधून दिसणार आहे. या सिनेमात सुबोध भावे आणि भरत जाधव यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल.