अभिनयानंतर राजकारणाची नवीन इनिंग सुरु केलेल्या अभिनेत्री प्रिया बेर्डे सध्या चर्चेत आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे प्रिया चर्चेत आल्या आहेत. “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं होतं.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या स्टेटमेंटमध्ये त्या म्हणतात, ‘हेमा मालिनी, स्मृती इराणी, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील दिग्गज कलाकार आहेत. मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार आहात का?’ असा सवाल त्यांनी केला आहे. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही शाब्दीक चकमक घडून आली.