दिनांक १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या "जयंती" चित्रपटाने माहिती सिनेसृष्टीत पुनःश्च हरिओम केला आहे. करमणुकीच्या माध्यमातून सामाजिक विषयाला हात घातलेल्या जयंती या सिनेमाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. या चित्रपटाचे प्रेक्षकच नव्हे तर आता चक्क मराठी चित्रपटसृष्टीही तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत.
जयंती या चित्रपटाचे पोस्टर जेव्हा जारी झाले तेव्हापासूनच या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. काही कालावधीनंतर चित्रपटाची गाणी तसेच ट्रेलर सोशल मीडियाद्वारे जारी करण्यात आला आणि लोकांच्या उत्सुकता अधिकच वाढल्या. चित्रपट प्रदर्शनाच्या अगदीच एक दिवस आधी सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांनी जयंती सिनेमाचा ट्रेलर शेयर करत संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या.
कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळत मराठी सिनेरसिकांनी चित्रपटगृहात गर्दी करत चित्रपटाप्रती प्रेम व्यक्त केले आहे. हे इथपर्यंत थांबले नसून आता मराठी सिने सृष्टीतील नामवंत व्यक्तींकडून देखील जयंतीची दखल घेताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष "अमेय खोपकर" यांनी फेसबुकद्वारे जयंतीचा पोस्टर पोस्ट करत सिनेमाला शुभेच्छा दिल्या.
तसेच "झी स्टुडिओज" चे "मंगेश कुलकर्णी यांच्या "पांडू" सिनेमाच्या परिवारातर्फे जयंतीला शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच सुप्रसिद्ध अभिनेता "सुबोध भावे" यांनी आगामी काळात येणाऱ्या सर्व मराठी चित्रपटांना आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. अशा प्रकारे सिनेसृष्टीतील सर्व स्तरातील मान्यवरांनी जयंतीबद्दल सोशल मीडियावर लिहीत कौतुक केले आहे.
मराठी सिनेसृष्टी एकमेकांसाठी परत नव्याने उभी राहत आहे हि एका नांदीची सुरुवात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. याबद्दल आपले मत व्यक्त करताना जयंती सिनेमाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे सांगतात, "मराठी कलाक्षेत्रात जयंतीसारखे विषय मोजण्याजोगेच आहे.
आणि आता थोरपुरुषांच्या विचारधारा व्यक्त करणारी जयंतीची कथा लोकांनादेखील आवडत आहे याचा आम्हाला आनंद आहे. कोरोनाकाळात चित्रपटातून आपली आर्थिक फट भरून काढण्यासाठी आम्ही सगळेच एकत्र येत एकमेकांना साहाय्य करत आहोत आणि ही एका नव्या युगाची सुरुवात आहे."