लग्नाआधीच्या बऱ्याच लव्हस्टोऱ्या आपण प्रत्यक्षात पहिल्या आहेत, काहींनी तर अनुभवल्या देखील आहेत. मात्र लग्नानंतरची पती पत्नी यांच्यातील लव्हस्टोरी नेमकी कशी असेल बरं? याचं साजेसं उत्तर घेऊन 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'सेवन सिझ मोशन पिक्चर' निर्मित 'जीव रंगलया' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट नेहमीच वेगवेगळे चित्रपट आणि गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात, यातच भर घालत ते लग्नानंतरची लव्हस्टोरी म्हणजे 'जीव रंगलया' हे गाणे घेऊन येत आहेत. या गाण्यात अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि विशाल फाले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विशाल फाले 'प्रिन्स ऑफ मुळशी' या नावाने खूपच प्रसिद्ध आहे. १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स असलेला विशाल नावाप्रमाणेच सोशल मीडियावर विशाल आहे. त्यांच्या या गाण्याचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून यांत ऋतुजा आणि विशाल रोमँटिक माहोल मध्ये पाहायला मिळत आहेत. या गाण्याच्या टिझरला ही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून या टिझरने सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे.
'जीव रंगलया' गाण्याच्या पोस्टरमध्ये या दोघांची जोडी अगदी खुलून दिसत असून बहरत जाणाऱ्या प्रेमाची गोडी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे. या गाण्यात पती पत्नीच्या लग्नानंतरचा रोमान्स, त्यांची जवळीक यांचे खूप सुंदर वर्णन पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित हे गाणे असून गाण्याचे बोल आणि गाण्याच्या निर्मितीत समीर परब यांचा खारीचा वाटा आहे. ओंकारने आजपर्यंत २० दिग्दर्शित केलेल्या गाण्यांचा पल्ला गाठला आहे. या रोमँटिक गाण्याला संगीत प्रितेश कामत यांनी दिले असून गायक भूषण गोसावी यांनी हे गाणं आपल्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केले आहे. या गाण्याच्या छायाचित्रणाची जबाबदारी शशिकांत सिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली.
प्रेमाची लव्हेबल केमिस्ट्री घेऊन 'जीव रंगलया' हे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करण्यास तयार झाले. गाण्याच्या पोस्टरने गाण्याची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. शिवाय या गाण्यात एका नव्या अंदाजात ऋतुजा आणि विशालला पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.