भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.
लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकारणी, सेलिब्रिटींसोबतच मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली आहे. फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये त्यांचं पार्थिव शरीर ठेवण्यात आलं आहे.ते आता शिवाजी पार्कवर दाखल झालं आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे दीदींवर अंत्यसंस्कार होणार आहे. तेथील ही क्षणचित्रे.
भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवाजी पार्कात अंत्यदर्शनासाठी दाखल
लता मंगेशकर यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.