By  
on  

मातृदिनानिमित्त आजीच्या आठवणीत ही मराठी अभिनेत्री झाली भावूक

मी माझ्या आजीला आई म्हणते आणि आईला मम्मी म्हणते. मदर्स डे निमित्त आईबद्दल बोलताना आज मी माझ्या आजीबद्दल बोलणार आहे, कारण ती मला खूप जवळची आहे. डिसेंबर महिन्यातच ती आम्हाला सोडून गेली. मी माझ्या मम्मी पप्पांकडे राहात असले तरी मला आईचा सहवास जास्त मिळाला आहे. कारण आम्ही शाळेत एकत्र होतो. माझ्या शाळेत ती शिपायाचे काम करायची. गंमत अशी की, त्याच शाळेत तिची एक मुलगी प्रिन्सीपल होती, पण तिनं तिचं काम कधी सोडलं नाही आणि कमीपणा वाटून घेतला नाही. आईनं आमच्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. तिच्या एवढे कष्ट कोणीच केले नाहीत, असं माझं मत आहे.

तिच्यासारखा प्रामाणिकपणा, जिद्द मी पाहिली नाही. माझ्या मम्मीकडे हे सगळे गुण आहेत. पण, आईसारखं कोणी नाही. आई गावातून पुण्यात आली तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं. तिनं सगळं कष्टानं कमावलं. तिच्याकडे शिक्षण नव्हतं. तिचे बाबा शिक्षण अधिकारी होते, पण दुर्देवानं तिचं शिक्षण होऊ शकलं नाही. पण, तिनं तिच्या तिन्ही मुलींना शिकवण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणेन माझ्या आईमुळे आणि मम्मीमुळे मी आज जी आहे ती आहे.

आई मला नेहमी प्रोत्साहन द्यायची. मम्मी पप्पा लग्नासाठी मागे लागायचे, पण आई मात्र ‘काहीही  होऊ दे अजिबात मागे हटायचं नाही. तुला मोठी हिरॉईन झालेलं बघायचं आहे. तूला जो पर्यंत वाटत नाही तो पर्यंत लग्न नाही केलंस तरी चालेल’, असं सांगून ती मला प्रोत्साहन द्यायची.

आई खूप सुंदर जेवण बनवायची. ती गेल्यापासून मी साबूदाणा खिचडी खाणं बंद केलं, कारण तिच्या सारखी खिचडी कोणीच बनवून देत नाही. तिच्या सारखी खोब—याची आणि शेंगदाण्याची चटणी कोणी बनवत नाही. माझ्या सेटवर त्या चटण्या प्रसिद्ध होत्या. तसंच थालीपीठ, बेसन भाकरी,कारल्याची भाजीही ती खूप भारी करायची. ती खूप हौशी होती. तिला नट्टापट्ट करायला आवडायचा, फोटो काढायला आवडायचं, नवीन  गोष्टी शिकायला आवडचं. इंग्लिश येत नसताना आमच्या सोबत बोलायचा प्रयत्न करायची. या सगळ्या गोष्टी मी मिस करते.

आज ती आमच्यात नाही. पण, त्यातही मी तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करु शकले नाही याची खंत आहे. माणूस असताना आपलं प्रेम व्यक्त करुन दाखवायला हवं हे प्रकर्षाने जाणवतं. तिच्यासोबत अजून बरंच फिरायचं होतं, तिला गोव्याला घेऊन जायचं होतं. जानेवारीत आम्ही जाणारही होतो, पण त्या आधीच ती गेली, तिचीही इच्छा नव्हती एवढ्यात जायची, पण सगळं अचानक झालं. मात्र, ती सतत माझ्याबरोबर आहे याची मला जाणीव आहे. थँक्यू आई मला तू घडवलसं. तू दिलेली शिकवण नेहमी लक्षात ठेवेन. तू माझी बेस्ट आई आहेस, तू पहिले आणि नंतर मम्मी आहे.

मिस यू आई.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive