नाटकातील काही गाणी व्हिडीओ स्वरूपात आणण्याचा प्रयोग मधुसूदन कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी सुरु केला त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभताना दिसत आहे. त्यामुळेच ‘वन मिनिट सॉंग’ या प्रयोगातील आणखी एक गाणं "अंधार सावलीचा" हे रसिकांच्या भेटीला आलं आहे, "अंधार सावलीचा" हे एक विरह गीत असून कामावर गेलेल्या नवर्याच्या आठवणीत पत्नीला प्रत्येक क्षण हा वेदना देणारा वाटायला लागतो, त्यावरच हे गीत बेतलेले असून या गीतामद्धे रौद्र चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी उर्मिला जगताप प्रमुख भूमिकेत दिसेल.
नाटकातील गाणे असल्यामुळे या गाण्याची लांबी जेमतेम सव्वा मिनिट असून, या गाण्याचे चित्रीकरण व दिग्दर्शन राहुल झेंडे यांनी केले आहे. हे गाणं गायिका निकिता पुरंदरेच्या आवाजात स्वरबद्ध झाले असून ते अक्षय संत यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याला स्वप्निल सावंत यांनी संगीतबद्ध केलेले असून याची अरेंजमेंट सुबोध भागात यांनी केली आहे.
अभिनव प्रयोगाबद्दल बोलताना उर्मिला जगताप म्हणाली कि “एक ते सव्वा मिनिट लांबीच्या गाण्याची संकल्पना खूपच आवडली, आणि गाण्याची चाल देखील आवडल्यामुळे हे गीत करण्याचा निर्णय घेतला, अगदी कमी वेळात आनंद देऊन जाणारं हे गाणं आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही हा प्रयोग नक्की आवडेल”.