गेल्या काही दिवसांपासून वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे दोघे नेमके कशासाठी एकत्र येणार याचा खुलासा मात्र झाला नव्हता. नुकतीच या दोघांनी ‘चल अब वहाँ’ या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी सॉंग अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना ‘सरप्राइज’ दिलं आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी आता ‘चल अब वहाँ’ या ‘व्हिडीओ पॅलेस’ निर्मित पहिल्या हिंदी अल्बममध्ये आपल्याला रोमँटिक अंदाजात दिसणार आहे.
‘चल अब वहाँ’ मीठी जहाँ बोलिंया’ !
‘चल अब जहाँ’ राते दिवाली हो, दिन हो होलिया’!
असे बोल असणाऱ्या या गाण्यातून वैभव आणि पूजा यांच्या प्रेमाचा सदाबहार रंग दिसणार आहे. आपल्या या नव्या अल्बमबद्दल बोलताना हे दोघं सांगतात, ‘काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाणी शूट करण्याचा आनंद तर होताच पण या गाण्याच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र काम करता आलं हे आमच्यासाठी जास्त ख़ास होतं. आम्ही हे गाणं खूप एन्जॉय केलं. प्रेक्षकही हे गाणं तितकच एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.
व्हिडीओ पॅलेस’ या नावाजलेल्या म्युझिक कंपनीच्या पहिल्या हिंदी अल्बममध्ये काम करायला मिळणं ही आमच्यासाठी अमूल्य भेट असल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. ‘व्हिडीओ पॅलेस’चे हिंदी निर्मितीतलं पदार्पणही यशस्वी होईल असा विश्वास ‘व्हिडीओ पॅलेस’च्या नानूभाई जयसिंघानिया यांनी व्यक्त केला.
‘चल अब वहाँ’ अल्बम मधील गाणं काश्मीरच्या निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रीत केलं आहे.
या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे.
तर काश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छायालेखक अमोल गोळे यांनी केले आहे. विदुर आनंद यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अब्दुल शेख यांचा स्वरसाज लाभला आहे.