आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करणाऱ्या जिद्दी 'सुमी'चा रंजक प्रवास आता प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर अनुभवयाला मिळणार असून नुकत्याच झालेल्या बालदिनाच्या निमित्ताने हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट महाराष्ट्रातील सुमारे ७० शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाहिला. शिक्षणाच्या ध्येयाने झपाटलेल्या 'सुमी'ची भूमिका आकांक्षा पिंगळे हिने साकारली असून या चित्रपटात दिव्येश इंदुलकर, स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अमोल वसंत गोळे दिग्दर्शित या चित्रपटाला रोहन - रोहन यांचे संगीत लाभले आहे.
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "हा चित्रपट म्हणजे बालदिनानिमित्ताने आमच्याकडून बालदोस्तांसाठी खास भेट आहे. सिनेमा जरी बालदिनानिमित्ताने प्रदर्शित केला असला तरी तो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा असा आहे. बालदिनानिमित्ताने 'सुमी' चित्रपट शाळेत दाखवण्यात आला आणि हा चित्रपट महाराष्ट्रातील अनेक मुलांनी पाहिला, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा, अशी आमची आशा आहे. विषय खूप सामान्य आहे, परंतु त्यामागची 'सुमी'ची जिद्द असामान्य आहे. प्रत्येक मुलाने उराशी एक ध्येय बाळगले पाहिजे आणि ते साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.''
दिग्दर्शक अमोल गोळे म्हणतात, "बालदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शाळांनी विद्यार्थ्यांना 'सुमी' हा चित्रपट दाखवला. यामुळे अनेक मुलांपर्यंत हा चित्रपट पोहोचला. आमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे. प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून काही टक्के जरी मुलं प्रेरित झाली तरी आमच्या कामाचे चीज झाले, असे आम्हाला वाटेल. हा चित्रपट बालदिनानिनित्ताने प्रदर्शित करणे, हे केवळ एक निमित्त होते. कोणत्याही क्षणी पाहिला तरी मुलांना, पालकांना सकारात्मक दृष्टीकोन देईल,असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध आहे. "
अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रोडक्शन्स् निर्मित, ए. फोर. क्रिएशन्स सहनिर्मित, 'सुमी' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाति एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा - पटकथा संजीव झा यांची आहे. तर या चित्रपटाला प्रसाद नामजोशी यांचे संवाद, गीत लाभले आहे.