‘अथांग’ वेबसिरीज या पिरीओडिक ड्रामाच्या ट्रेलर लॉंच नुकताच मुंबईत पार पडला. या ट्रेलर लॉंचचं विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खास मुलाखत. अथांग या वेबसिरीजची निर्माती अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत घेतली. अनेक विषयांवर तिने राज यांना बोलतं केलं. मनोरंजनविश्वाबदद्ल त्यांनी आपलं मतसुध्दा यावेळी मांडलं . राज ठाकरे यांच्यावरच जर बायोपिक आला तर त्यात कोणता अभिनेता तुमच्या भूमिकेत चपखल बसेल, तसंच त्यात कोणता मेलोड्रामा पाहायला मिळेल याची त्यांनी अगदी त्यांच्या स्वभावाप्रमाणेच मिश्किल उत्तरं दिली.
याचदरम्यान राज ठाकरेंचं सिनेप्रेम लक्षात घेता तेजस्विनीने आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाचा चौकार मारला, तो म्हणजे राज हे सिनेमा दिग्दर्शनाकडे वळणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर, राजकारण आणि फिल्म मेकींग असं दोन्ही एकत्र सांभाळणं कठीण असल्याचं ते म्हणाले. तरी, राज ठाकरेंनी यावेळी आपल्या पहिल्या सिनेमाबाबत मोठी घोषणा केली. आपण लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर तीन भागांचा सिनेमा बनवणार असल्याचं स्प्ष्ट केलं.
राज याविषयी स्पष्टच म्हणाले, "सध्या एक विषय माझ्या डोक्यात आहे. पण नुकतेच महाराजांवरती एवढे चित्रपट येऊन गेले की, मला आता त्या विषयाला हात लावण्याची हिंमत होत नाही. पण मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा गांधी चित्रपट पाहिला होता, त्यावेळी मला असं वाटलं होतं की महाराजांवर असा मोठा चित्रपट व्हायला हवा आणि माझं आता त्याच्यावर काम सुरू आहे. आणि मला असं वाटतं की तीन भागात ही फिल्मी येईल.”
राज ठाकरेंच्या या स्पष्ट उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सिनेप्रेमी कलाप्रेमी तर ते आहेतच पण आता खुद्द सिनेदिग्दर्शनात ते उतरणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.