ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं दुखद निधन झालं आहे. गेल्या 15 दिवसांपासून ते पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक गुंतागुंत असल्याचं डॉक्टरांनी गुरुवारी मेडिकल बुलेटिनमध्ये जाहीर केलं होतं. व्हेंटिलेटरवर असलेल्या विक्रम गोखले यांना वाचविण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांची प्राणज्योत आज मालवली.
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एका युगाचा अंत झाला आहे. विक्रम गोखले यांच्या पश्चात त्यांची पत्नी वृषाली आणि दोन मुली असा परिवार आहे.
ब्लॅक आणि व्हाईट पासून रुपेरी पडदा गाजवणा-या विक्रम गोखले यांची आजपर्यंतच्या गोदावरीपर्यंतची कारकिर्द लक्षवेधी ठरली. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांनी आपलं खास स्थान निर्माण केलं. वऱ्हाडी आणि वाजंत्री हा 1973मध्ये आलेला सिनेमा विक्रम गोखलेंच्या आयुष्यातील महत्त्वाचा सिनेमा ठरला. प्रेम विवाहावर आधारित या सिनेमात विक्रम गोखले यांनी प्रोफेसर गोविंदराव ही भूमिका साकारली होती. माहेरची साडी, कळत नकळत, वझीर, बाळा गाऊ कशी अंगाई, दरोडेखोर, नटसम्राट, निळकंठ मास्तर या सिनेमांत त्यांनी दमदार भूमिका साकारल्या,
विक्रम गोखले यांचा 'लागलं का पाणी मारूतीच्या पायाला' हा एकच डायलॉग संपूर्ण सिनेमात चटका लावून गेला. स्मृर्तीभंश झालेल्या नारुशंकर आजोबांची भूमिका विक्रम गोखलेंनी अजरामर कली.