अनेक मराठी सिनेमांचे प्रसिध्दी प्रमुख असलेले मिडीया डिरेक्टर प्रेम झांगियानी यांचं निधन झालं आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा सिनेमा व पुष्कर जोग आणि ,सोनाली कुलकर्णी यांचा 'व्हिक्टोरिया' ह्या सिनेमाच्या प्रसिध्दीची धुरा प्रेम हे सांभाळत होते. हे दोन सिनेमे त्यांचे अखेरचे ठरले. वयाची साठी होऊनसुध्दा तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह होता. सिनेमांच्या प्रमोशनदरम्यान पत्रकारांशी नेहमीच आपुलकीने आणि संयमाने ते दुवा म्हणून काम पाहत असत. सर्वांशीच ते नेहमी आपुलकीने वागत.
प्रेम यांच्या निधनावर रितेश देशमुखनेसुध्दा शोक व्यक्त केला आहे. रितेश म्हणतो, प्रेम हे या जगात नाहीत यावर विश्वासच बसत नाहीय. वेड या सिनेमाचं संपूर्ण प्रोमोश कॅम्पेन त्यांनी धुवांधारपणे सांभाळलं. त्यांच्या सारखा उत्तम माणूस गमावला. मी तुम्हाला मिस करेन सर. त्यांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
तर जिनिलिया देशमुख म्हणते, प्रेमजी आपण वेड सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोनच दिवसांपूर्वी एकत्र होतो. ह्या बातमीवर माझा विश्वासच बसत नाही. तुम्ही आमची टीम होतात. मी तुम्हाला फार मिस करेन.
तर अभिनेता पुष्कर जोगनेसुध्दा त्यांचा फोटो शेयर करत त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
प्रेम झांगियानी हे प्रसिध्दी प्रमुख असण्यासोबतच एक अभिनेतेसुध्दा होते. अनेक हिंदी मालिका व काही सिनेमांमधून ते झळकले होते.