‘शिवराय अष्टक’ जगणाऱ्या साकारणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण युनिटबरोबर चित्रीकरण स्थळी ‘गुरुकुल’ पुरस्काराने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना हा दुर्मिळातील दुर्मिळ योग असल्याचे प्रतिपादन चित्रपटसृष्टीचे पितामह ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले. आद्य संगीताचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या घराण्याचा आशीर्वाद म्हणून विश्वरूप कन्सेप्ट डेव्हलपर्स आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटतर्फे श्री राजदत्त यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
मावळातील कुसगाव येथील पीबीए फिल्मसिटीत शूटिंग दरम्यान हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी दिग्पाल लांजेकर यांचे गुरु ज्येष्ठ लोकशाहीर दादा पासलकर, दिग्पाल यांच्या मातोश्री सुनीता लांजेकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे, अभिनेते चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मिलिंद कांबळे, संकलक भक्ती मायाळू, योगेश फुलफगर आणि युनिटचे तंत्रज्ञ, कलाकार उपस्थित होते. प्रस्तावना व सूत्रसंचालन माध्यमकर्मी गिरीश केमकर यांनी केले तर मानपत्राचे वाचन अमृता धायरकर यांनी केले.
‘शिवराय अष्टका’चे शिवधनुष्य दिग्पाल लांजेकर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून समर्थपणे पेलले आहे. ‘आज नव्वदीत त्यांनी दिलेली भूमिका मोठ्या आनंदाने मी पार पाडत आहे, असे मनोगत राजदत्त यांनी व्यक्त केले. वेगवेगळी आव्हाने, अनेक अडचणीतून मार्ग काढताना माझ्यासह संपूर्ण युनिटलाच या ‘गुरुकुल’ पुरस्काराने मोठी उमेद, ऊर्जा मिळेल असं मनोगत दिग्पाल लांजेकर यांनी याप्रसंगी मांडलं. मुळात कुणीतरी कोणाच्यातरी भावनांचा आदर करत नाही म्हणून वाद निर्माण होतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे सर्वोच्च दैवत आहे. आठ ते ऐंशी अशा सर्वच वयोगटातील प्रत्येकाच्या भावना संवेदना शिवचरित्राशी निगडीत आहेत. या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतल्याने ‘शिवराय अष्टक’ कोणताही वाद न होता पूर्णत्वास गेले आहे. दिग्पालचे यश हे उत्तम सांघिक कार्यात आहे. हे कोणा एकाचे कामच नाही, अशी भावना श्रीमती सुनीता लांजेकर यांनी व्यक्त केली.