मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिचे पती समीर वानखेडे अनेक कारणांनी चर्चेत असतात. आर्यन खान ड्रग केसवर काम करणारे तसंच अनेक बॉलिवूड कलाकारांच्या ड्रग्सच्या वापरावर कारवाईचा बडगा उचलणारे पोलीस अधिकारी समीर वानखेडे प्रसिध्दी झोतात आले. क्रांती सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. नानाविविध कॉमेडी पोस्ट करत ती चाहत्यांची मनं जिंकते. समीर आणि क्रांती या जोडीची नेहमीच चर्चा रंगते. नुकतंच त्यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही चोरी ओळखीतील व्यक्तीनेच केल्याचं तपासात उघड झालं आहे.
घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ही चोरी केली असल्याचा आरोप क्रांती रेडकर हीने केला आहे. घरातील मौल्यवान असे साडेचार लाख रुपये किमतीचे घड्याळं चोरी झाल्याची तक्रार क्रांतीने नुकतीच गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यासंदर्भात अधिकचा तपास करत आहेत.
या प्रकरणाबद्दल पोलिसांनीही काही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती रेडकर यांनी एका एजन्सी मार्फत घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. मात्र काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना योग्य संधी साधत तिने ही चोरी केली. त्यानंतर ही महिला फरार झाली आहे. आता गोरेगाव पोलीस त्या महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजन्सीचा तपास करत असून त्या महिलेचा देखील शोध घेत आहेत.