बालकवींची 'फुलराणी' म्हणजे नितांतसुंदर काव्य… महाराष्ट्राच्या कितीतरी पिढ्या या फुलराणीने फुलवल्या. त्यामुळेच मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता असणं साहजिकच होतं. चित्रपटात फुलराणी कशी असणार? आणि विशेष म्हणजे कोण असणार? याविषयी खूप उत्सुकता पहायला मिळते आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून चर्चेत असलेल्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे एक आकर्षक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निळ्या डेनिमच्या आकर्षक रंगसंगती केलेल्या कपडयातील फुलांनी मढलेली, आत्मविश्वासाने मोबाईलवर बोलणारी, पाठमोरी ‘फुलराणी’ पहायला मिळत आहे. आजच्या जमान्यातील ही स्मार्ट ‘फुलराणी’ कोण? याची उत्सुकता या पोस्टरने नक्कीच वाढवली आहे.
‘फुलराणी’ नेमकी कोण असणार? याचा उलगडा लवकरच होणार असून येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर २२ मार्चला ही ‘फुलराणी’ मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. यातील विक्रम राजाध्यक्ष ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे.
‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट साकारत आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ आणि ‘अमृता फिल्म्स’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून जाई जोशी, विश्वास जोशी, श्री.ए.राव या चित्रपटाचे निर्माते आहेत. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे.
उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साथीने या फुलराणीचा मनमोहक सुगंध २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दरवळणार असून ही ‘फुलराणी’ प्रेक्षकांनाही मोहित करेल असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात. वायकॉम १८ स्टुडिओ ‘फुलराणी’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळीत आहेत.