अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा वेड हा सिनेमा सगळ्यांना भुरळ पाडतोय. बॉक्स ऑफीसवर तर वेडची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरु आहेत. अनेक सेलिब्रिटीसुध्दा या सिनेमाच्या आणि त्याच्या गाण्यांच्या प्रेमात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सिनेमांची आणि मनोरंजनविश्वाची किती आवड आहे, हे आपल्या सर्वांनाच माहितीय. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी रितेश देशमुख व जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक केलं होतं.
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने कोटींची कमाई करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने ‘सैराट’चाही रेकॉर्ड मोडला आहे. त्यांच्या या चित्रपटाची भूरळ शर्मिला ठाकरे यांनाही पडली आहे.
नुकतंच त्यांनी दादर येथील प्लाझा चित्रपटगृहांत ‘वेड’ चित्रपटाच्या शोदरम्यान हजेरी लावली. यावेळी रितेश व जिनिलीयाने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. ‘वेड’ चित्रपटासाठी शर्मिला ठाकरे यांनी प्लाझा हे थिएटर बुक केलं होतं.
राज ठाकरेंनी ‘वेड’ चित्रपटातील गाणी किंवा ट्रेलर पाहून काही प्रतिक्रिया दिली का?, असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. यावर उत्तर देत तो म्हणाला, “राज ठाकरे सध्या कामामध्ये व्यग्र आहेत. मी राज ठाकरे यांच्याबरोबर ‘वेड’ चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मी शर्मिला ठाकरे यांनाही याबाबत विचारलं होतं. मी एका शोबाबत विचारलं, त्यांनी ‘वेड’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं”.