भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जानेवारी महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. स्वरसम्राज्ञीच्या जाण्याने अवघा देश शोकसागरात बुडाला. 6 फेब्रवारी 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांची प्रथम पुण्यतिथी आहे.
लतादीदींचं किशोरवयीन जीवन संघर्षपूर्ण राहिलं. लता दीदी या फक्त 13 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांना अभिनय व गायन क्षेत्रात आणलं. 1942 साली लतादीदींनी एका मराठी सिनेमात अभिनय केला होता, ही बाब फार कमी चाहत्यांना ठाऊक आहे.
वडिलांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर होती. भाऊ हदयनाथ, आशा मंगेशकर, उषा मंगेशकर या सर्वांची जबाबदारी दीदींनी घेतली. त्यांची शिक्षणं, व्यावसायिक कारकिर्द, लग्न यांच्यातच त्या गुरफटून गेल्या. दरम्यान लग्नाचा विचार त्यांच्या मनात डोकवायचा परंतु, तो अमलात आणण्याएवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. भावंडाचं सगळं यथासांग करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं व अविवाहित राहिल्या.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे.