Lata Mangeshkar Death Anniversary :“दीदी गेल्या असल्या तरी…” लता मंगेशकरांच्या आठवणीत राज ठाकरेंची पोस्ट

By  
on  

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाला वर्ष झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जानेवारी महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. स्वरसम्राज्ञीच्या जाण्याने अवघा देश शोकसागरात बुडाला. 6 फेब्रवारी 2022 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांची प्रथम पुण्यतिथी आहे.

लता दिदींच्या आठवणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भावूक झाले आहेत. त्यांनी लतादिदींसाठी एक पोस्ट केली आहे. 

 

राज ठाकरेंची पोस्ट

“दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील.

चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील.

दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे”

Recommended

Loading...
Share