मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कित्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.
१६ फेब्रुवारी १९८० साली कै. मच्छिन्द्र कांबळी यांनी "वस्त्रहरण" या नाटकाचा पहिला प्रयोग केला. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेली "वस्त्रहरण" ही अजरामर कलाकृती येत्या १६ फेब्रुवारी रोजी ४४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर करणार असून लवकरच प्रयोग क्र. ५२५५ रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर होणार असल्याचे प्रसाद कांबळी यांनी सांगितले.