संपूर्ण जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत 'अम्ब्रेला' या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. मनोज विशे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हेमल इंगळे, अभिषेक सेठीया मुख्य भूमिकेत असून, अरुण नलावडे आणि सुहिता थत्ते महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. स्वरानंद क्रिएशन आणि ब्ल्यू अम्ब्रेला एन्टरटेन्मेंटची निर्मिती आणि सिनेमास्टर्स एन्टरटेन्मेंट प्रस्तुती असलेला 'अम्ब्रेला' २०२३ मधील दुसऱ्या तिमाहीत रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे.
मनोज विशे आणि अरविंद सिंग राजपूत 'अम्ब्रेला'चे निर्माते असून, अविराज दापोडीकर, सचिंद्र शर्मा, सार्थक अधिकारी, आशिष ठाकरे आणि निलेश पाटील सहनिर्माते आहेत. 'अम्ब्रेला' ही एका सुशिक्षित, कुटुंबाभिमुख जोडप्याची हळुवार, संगीतमय प्रेमकथा आहे ज्यांच्या प्रेमामुळे दोन कुटुंबातील नातेसंबंधात भावनिक दुरवस्था होते, पालकांच्या असलेल्या अपेक्षांमुळे मुलांच्या भावविश्वात उलथापालथ होते. 'अम्ब्रेला'च्या दिग्दर्शकाविषयी बोलताना मनोज विशे म्हणाले की, 'अम्ब्रेला' हा आमच्यासाठी खास चित्रपट आहे. या चित्रपटात एखादी सामान्य प्रेमकथा पहायला मिळणार नाही. 'अम्ब्रेला'चे मंत्रमुग्ध करणारे संगीत आणि प्रेमकथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
प्रस्तुतकर्ते सिनेमास्टर्स एन्टरटेन्मेंटचे अरविंद सिंग राजपूत म्हणाले की, कथा ऐकताच आम्ही 'अम्ब्रेला' सादर करण्यासाठी तयार झालो. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना आपलासा वाटेल. एक कंपनी म्हणून आम्ही नेहमीच चांगल्या कंटेंटचे समर्थन करण्यावर विश्वास ठेवतो आणि मला 'अम्ब्रेला'सारखी कथा खूप दिवसांत आलेली नाही. गीतकार मंगेश कांगणे यांनी 'अम्ब्रेला'साठी लिहिलेल्या गीतरचना संगीतकार संतोष मुळेकर यांनी अजय गोगावले, दिवंगत के.के., सुनिधी चौहान, नकाश अझीझ, आनंद शिंदे आणि भारती माधवी या गायकांच्या आवाजात संगीतबद्ध केल्या आहेत.