महाराष्ट्राला शाहिरी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रासाठी शाहिर साबळे हे नाव खुप मोठं नाव. या नावालाच मोठा मानसन्मान लाभला आहे. एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिध्द असण्यासोबतच ते भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रीय सहभागी होते.
'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि 'महाराष्ट्राची लोकधारा' या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते आणि दिग्दर्शक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीला समाजात ओळख मिळवून दिली. त्यांचे 'गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.
शाहीर साबळे यांचे नातू प्रसिध्द मालिका नाट्य आणि सिने- दिग्दर्शक केदार शिंदे हे त्यांच्या जीवनावर आधारित शाहिर हा भव्य सिनेमा घेऊन रसिकांसमोर येतायत. या सिनेमात शाहिरांची प्रमुख व्यक्तिरेखा सुप्रसिध्द अभिनेता अंकुश चौधरी साकारतोय. या सिनेमाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. तर सिनेमाला संगीत महाराष्ट्राची लाडकी जोडगोळी अजय- अतुल यांचे असणार आहे.
तत्पूर्वी या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचं अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.
हा बहुप्रतीक्षित सिनेमा येत्या २८ एप्रिलला सर्व चित्रपटगुहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.