कैलास वाघमारे हे नाव आता मराठी मनोरंजन विश्वात नवं नाही. तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमातील छोट्या पण लक्षवेधी भूमिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहचला. त्याबरोबरच शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने कैलासला वेगळी ओळख दिली.लवकरच गाभ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
याच निमित्ताने एका मुलाखतीत कैलासने आपली कैफियत मांडली आहे. त्याला कशाप्रकारे इंडस्ट्रीत जज केलं गेलं ह्यावर तो व्यक्त झाला आहे
''एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात काम देताना काही लोक तु्म्हाला विविध नजरेतून पाहतात. मी भाषेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची भाषा समोरच्या व्यक्तीला तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही तुमचं तोंड उघडता. पण जेव्हा तोंड उघडण्याआधी तुम्हाला जज केलं जातं, तेव्हा त्याचं काय करायचं?''
''मला तर पाहिल्याबरोबरच माझी एखाद्या श्रेणीत विभागणी केली जाते. हा कोणत्या तरी एका विशिष्ट जात, समूहाचा असणार किंवा हा गावाकडचा असणार आहे. याचाच अर्थ याला काहीच येत नसणारं. त्यानंतर मात्र तुम्हाला ट्रीट करणं सुरु होतं,'' असा भयानक अनुभव कैलासने सांगितला.
पुढे तो म्हणाला, ''मला तर अनेकदा माझ्या दिसण्यावरुन बोललं गेलं. मी काही बोलण्यापूर्वी माझ्याबद्दल मतं बनवली गेली. पण याच परिस्थितीने मला तितक्याच हिमतीने तोंड द्यायला शिकवलं. आता माझा अभिनय पाहिला की सर्वजण शांत होतात,' असे तो म्हणाला.