मराठी सिनेमातील चित्रपट व कलेतील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी पुन्हा एकदा येत आहे. गौरवशाली पुरस्कारांच्या ह्या 7व्या पर्वाच्या आयोजनासाठी प्लॅनेट मराठीशी टायटल पार्टनर म्हणून सहयोग करण्यात आला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 ह्या बहुप्रतिक्षित पुरस्कारांद्वारे, 1 जानेवारी 2022 व 31 डिसेंबर 2022 ह्या कालखंडात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील, सर्वांत स्मरणीय कामांपैकी काहींचा, गौरव केला जाणार आहे. यंदाच्या भव्य उत्सवात मनोरंजक नाट्ये, जादूई क्षण आणि नेत्रसुखद विजय बघायला मिळणार आहेत. मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालीदास नाट्यमंदिरात, 30 मार्च 2023 रोजी रंगणार असलेली ही मानाची पुरस्कार रजनी, पात्र विजेत्यांना, प्रतिष्ठेचे प्रतीक असलेल्या ब्लॅक लेडीने, सन्मानित करणार आहे.
ह्या बहुप्रतिक्षित सोहळ्याची सुरुवात म्हणून 23 मार्च 2023 रोजी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. प्रतिभावंत कलावंत आणि देखणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख व संस्थापक अक्षय बर्दापूरकर ह्यांच्या साथीने नवीन पर्वाच्या शुभारंभासाठी दीप प्रज्ज्वलित केला. त्यानंतर माध्यमाच्या प्रतिनिधींना संबोधित करण्यात आले आणि आगामी पुरस्कार सोहळ्याची एक झलक त्यांना दाखवण्यात आली.
प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 हा प्रेक्षकांसाठी गुदगुल्या करणारा अनुभव ठरणार आहे, कारण, सूत्रसंचालनाची धुरा अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव ह्यांच्यावर आहे. त्यांची विनोदाची चपखल समज सर्वांना हसवणार ह्यात शंकाच नाही. वैदेही परशुरामी, पूजा सावंत आणि अमृता खानविलकर ह्या अभिजात सौंदर्यवती त्यांच्या चैतन्याने सळसळणाऱ्या सादरीकरणांनी प्रेक्षकांवर गारुड करणार आहेत, सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहेत. प्रतिभावान कलावंत श्रेयस तळपदेचे एक प्रभावी सादरीकरणही ह्यावेळी बघायला मिळणार आहे. शिवाय ह्या रजनीमध्ये आणखी दोन रोमांचक सादरीकरणे होणार आहेत. ह्यातील एक देखणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करणार आहे, तर दुसरे अंकुश चौधरी आणि सना शिंदे करणार आहेत.
प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 म्हणजे मनोरंजन व हास्याने परिपूर्ण अशा प्रसन्न संध्याकाळीची हमी आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालक अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव आपल्या अचूक विनोदी टायमिंगद्वारे नक्कीच हास्याच्या लहरी उमटवतील. वैदेही परशुरामी, पूजा सावंत आणि अमृता खानविलकर ह्या देखण्या अभिनेत्री त्यांच्या सळसळत्या सादरीकरणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत आणि त्यांना थक्क करून सोडणार आहेत. या सोहळ्यात अत्यंत प्रतिभावान कलावंत श्रेयस तळपदेही एक प्रभावी सादरीकरण करणार आहे. ह्या रोमांचात भर घालणारी आणखी दोन तेजस्वी सादरीकरणे होणार आहेत, ह्यातील एक एव्हरग्रीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे असेल, तर दुसरे अंकुश चौधरी व सना शिंदे ह्यांचे असेल.
वर्ल्डवाइड मीडियाचे सीईओ श्री. दीपक लांबा, पुरस्कारांच्या ह्या आगामी पर्वाबद्दल म्हणाले, “आपल्या खिळवून ठेवणाऱ्या कथा व समृद्ध सादरीकरण ह्यांच्या जोरावर गेल्या अनेक दशकांत मराठी सिनेमा सिनेमॅटिक उत्कृष्टतेची खाण म्हणून उदयाला आला आहे. आपल्या अपवादात्मक प्रतिभेच्या माध्यमातून कथा पडद्यावर जिवंत करून प्रेक्षकांवर कधीच पुसला न जाणारा ठसा उमटवणाऱ्या ह्या अप्रतिम कलाकृतींमागील प्रतिभावंत द्रष्ट्यांची कला फिल्मफेअर केवळ साजरी करत नाही, तर ह्या कलेचा सन्मान करते. प्लॅनेट मराठी ओटीटीसोबत दीर्घकाळापासून असलेला सहयोग आणखी पुढे नेता आला ह्याचा आम्हाला आनंद वाटतो. ह्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांना एका खऱ्या अर्थाने अविस्मरणीय रजनीचा अनुभव घेता येणार आहे.”
फिल्मफेअरचे संपादक श्री. जितेश पिल्लई आगामी सोहळ्याबद्दल वाटणारा रोमांच व्यक्त करताना म्हणाले, "ब्लॅक लेडी हे गेल्या अनेक दशकांपासून भारतीय सिनेमातील उत्कृष्टतेचे प्रतीक आहे आणि मागील सहा पर्व प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर आता ह्या पुरस्कारांचे 7वे पर्व घेऊन येणे आमच्यासाठी थरारक अनुभव आहे. मराठी सिनेमाने समृद्ध वारसा, बहुपदरी सादरीकरण व कालातीत कथा ह्यांच्या माध्यमातून चित्रपटप्रेमींच्या अनेक पिढ्यांची मने जिंकली आहेत. मराठी सिनेमाचा विख्यात वारसा ह्यामागे आहे. सिनेमॅटिक उत्कृष्टतेला केलेल्या वंदनासाठी कायम स्मरणात राहील असा एक खिळवून टाकणारा सोहळा आखण्यास आम्ही उत्सुक आहोत."
प्लॅनेट मराठी ओटीटीचे संस्थापक व प्रमुख श्री. अक्षय बर्दापूरकर फिल्मफेअरसोबतच्या सहयोगाबद्दल म्हणाले, "फिल्मफेअर पुरस्कार हे आपल्या देशातील सिनेमॅटिक कामाला दिल्या जाणाऱ्या सर्वांत प्रतिष्ठेच्या मान्यतांपैकी एक असून, ह्याचे लक्षावधी चाहते आहेत. हे पुरस्कार उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान तर करतातच, शिवाय, अनेक नवोदित प्रतिभावंतांना, आपल्या सीमा विस्तारून ही प्रतिष्ठेची ब्लॅक लेडी घरी घेऊन जाण्यासाठी, प्रेरणा देणारा तो एक स्रोत आहे. आपल्या विस्तृत उत्पादनांच्या माध्यमातून मराठी चित्रपट उद्योगाला बढावा देण्यात व प्रोत्साहन देण्यात प्लॅनेट मराठी ओटीटी कायमच अग्रभागी राहिले आहे आणि आपल्या मान्यतेच्या माध्यमातून उद्योगाचे यश साजरे करणाऱ्या फिल्मफेअरशी पुन्हा एकदा सहयोग करणे आमच्यासाठी आनंददायी आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2022 ह्या 7व्या पर्वासाठी त्यांच्याशी सहयोग करता आला ह्याचा आम्हाला खूप आनंद व अभिमान वाटतो. आमचा सहयोग पुन्हा एकदा भव्य यश मिळवेल अशी खात्री आम्हाला वाटते. मराठी सिनेमा संपूर्ण जगात पोहोचवण्याचे उद्दिष्ट प्लॅनेट मराठीपुढे आहे आणि ह्यासाठी संप्रेरकाची भूमिका फिल्मफेअरशिवाय दुसरे कोणी अधिक चांगली करूच शकणार नाही.”
प्रतिभावान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मराठी सिनेमातील सर्वोत्कृष्ट कलाप्रतिभा साजरी करणाऱ्या ह्या लोकप्रिय व भव्य सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान व संधी पुन्हा एकदा मिळणे माझ्यासाठी थरारून टाकणारा अनुभव आहे. फिल्मफेअर हा भारतीय सिनेमाचा आधारस्तंभ आहे आणि कलावंतांना त्यांचे सर्वोत्तम देऊन प्रतिष्ठेची ब्लॅक लेडी हातात घेण्याचे स्वप्न साध्य करण्यासाठी हा प्रेरणेचा स्रोत आहे.”