मालवणी भाषेतला गोडवा आजही रसिकांच्या मनात कायम आहे. नाट्य रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते राहुल भंडारे आणि महेश वामन मांजरेकर यांनी दहा वर्षापूर्वी प्रचंड लोकप्रिय झालेले “करून गेलो गांव” हे मालवणी नाटक पुन्हा नव्या रूपात रंगभूमीवर आणले आहे. अद्वैत थिएटर्स व अश्वमी थिएटर्स निर्मित या नाटकातील हुकमी एक्का भाऊ कदम दहा वर्षापूर्वी नाटकाच्या पहिल्या प्रयोगापसून ते आत्तापर्यंत रसिकांचं अविरत मनोरंजन करीत असून या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. राजेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार्या या नाटकाची थीम तीच असली तरी काळानुसार सध्याच्या घडामोडीवर आधारीत थोडेफार बदल करण्यात आले आहेत. कॉमेडीचे बादशाहा भाऊ कदम चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात आता नाटकातून देखील भाऊ कदम आपल्या विनोदाची आणि अभिनयाची जादू दाखवून देणार आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून विनोदाच्या अफलातून टायमिंगनं सर्वांना हसवणारा कोकण कोहिनूर अर्थात अभिनेता ओंकार भोजने आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. विशेष म्हणजे त्याला कॉमेडीचा बादशाह भाऊ कदमची साथ मिळणार आहे. या नाटकाच्या निमित्तानं विनोदवीरांची एक नवी आणि अनोखी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ओंकार भोजने आणि भाऊ कदमबरोबरच या नाटकात अभिनेत्री उषा साटम, नुपूर दूदवडकर, प्रणव जोशी, अनुष्का बोऱ्हाडे, सौरभ गुजले, सचिन शिंदे, सुमित सावंत, दिपक लांजेकर हे कलाकार देखील आहेत. मुंबई व महानगरात प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हाऊसफुल्लचा बोर्ड झळ्कविलेलं हे नाटक आता संपूर्ण महाराष्ट्रात धमाल करण्यास सज्ज झाले आहे.