ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं बुधवारी निधन झालं आहे . वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या त्या विद्यार्थिनी होत्या. इब्राहिम अल्काझी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरा बावकर यांची अभिनय क्षेत्रातील जडणघडण झाली. त्या उत्तम गायिकासुद्धा होत्या.
1984 मध्ये त्यांना हिंदी नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर 1988 मध्ये ‘एक दिन अचानक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि 1995 मध्ये ‘दोघी’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान झाला.
दिवंगत सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं.दोन-एक वर्षांपूर्वी आलेल्या 'दिठी' चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच त्यांच्या धारदार आवाजाचा एक वेगळीच जादू होती.
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘एक उत्कृष्ट अभिनेत्री. त्यांनी त्यांच्या असंख्य अविस्मरणीय नाटकांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या रंगमंचावर राज्य केलं.त्याचसोबत सुमित्रा यांच्याच ‘भैस बराबर’ या सीरिजमध्ये आणि बिपीन नाडकर्णींच्या ‘उत्तरायण’ चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं. माझ्या होम प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या ‘शेवरी’ या चित्रपटात माझ्या आईची भूमिका साकारण्यासाठी मी त्यांच्याकडे विनंती केली होती. त्यांनी ही विनंती स्वीकारली आणि चित्रपटात मोलाची कामगिरी केली. त्या अत्यंत उल्लेखनीय, अष्टपैलू कलाकार होत्या. उत्तरा ताई.. भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा शब्दांत नीनाताई भावूक होत व्यक्त झाल्या.