शाहरुख खान आणि काजोल स्टारर दिलवाले दुल्ंहनियॉं लेजांऐे या क्लासिक सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा सिनेमा म्हणजे अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. सिनेमासोबत सर्वांच्या आठवणी जोेडल्या गेल्या आहेत. ही एक क्लासिक कलाकृती मानली जाते. मराठा मंदिर या चित्रपटगृहात या सिनेमाने २४ वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण केला. राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांची लव्हस्टोरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना भुरळ घालते आहे. यातील गाणीसुद्धा आजही लोक आवडीने ऐकतात.
मराठा मंदीर या सिनेमागृहात हा सिनेमा आजही सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय का भटकंती फेम प्रसिध्द मराठी अभिनेते मिलींद गुणाजी या अजरामर कलाकृतीत झळकले असते. परंतु त्यांना ह्या भूमिकेसाठी इच्छा असूनही नकार द्यावा लागला. त्यामुळे दुस-या अभिनेत्याच्या वाट्याला ही भूमिका आली. शाहरुख सोबत झळकणारी ही भूमिका नेमकी कोणती होती, याबद्दल जाणून घेऊयात.
अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. मिलिंद म्हणाले, ते या चित्रपटात काजोलच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारणार होते, पण त्यांनी ही संधी गमावली आणि अखेर ही भूमिका परमीत सेठीला देण्यात आली. मिलिंद म्हणाले की, जेव्हा डीडीएलजेच्या टीमने त्यांना भूमिकेसाठी बोलावले तेव्हा निर्मात्यांनी एक अट घातली होती. निर्मात्यांना क्लीन शेव्हन (दाढी नसलेला) अभिनेता हवा होता. याच एका अटीमुळे मिलिंद तो सिनेमा करू शकले नाहीत. याचं कारण देताना ते म्हणाले की, 'मी तेव्हा दाढी काढू शकत नव्हतो कारण त्याचवेळी मी तीन ते चार इतर सिनेमांचे शूटिंग करत होतो, ज्यासाठी दाढी ठेवणं मला आवश्यक होतं. यामुळे डीडीएलजेचा भाग होऊ शकलो नाही याचं मला खूप वाईट वाटलं होतं.'