अभिनेता संतोष जुवेकरच्या रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत तो दिसणार आहे. आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात ‘जालिंदर’ या भूमिकेत तो दिसणार आहे. संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळया धाटणीची ही भूमिका आहे. कपटी स्वभावाचा जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून कसे डावपेच रचतो? हे यात पहायला मिळणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली असून येत्या १२ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं’. ‘रावरंभा’ च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. निगेटिव्ह शेडची ही भूमिका असून मला स्वतःला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं. तेच प्रेम ‘जालिंदर’ ला मिळेल असा मला विश्वास आहे.
शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत.