अबब ! 140 कलाकारांची 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी', काय आहे सिनेमा?

By  
on  

तब्बल १४० कलाकारांचा समावेश असलेली 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' साकारत आहे. दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांच्या दिग्दर्शनातून या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट घेऊन येणार आहेत. पुरस्कारप्राप्त दोन दिग्दर्शकांनी एक चित्रपट करण्याचा योग या निमित्तानं जुळून आला आहे.

'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'ची निर्मिती फटमार फिल्म्स एलएलपीच्या नेहा गुप्ता, प्रसाद नामजोशी, नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा करत आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला असून, पुणे आणि परिसरात चित्रीकरण सुरू झालं आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. अनेक मातब्बर कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. 

प्रसाद नामजोशी यांनी या पूर्वी 'रंगा पतंगा' आणि व्हिडिओ पार्लर, तर सागर वंजारीनं 'रेडू' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या दोघांच्याही चित्रपटांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय दोन्ही दिग्दर्शक राज्य पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामुळे  'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' असं आकर्षक नाव असलेल्या या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच सकस मनोरंजनाची मेजवानी मिळेल. 

'रंगा पतंगा आणि व्हिडिओ पार्लर या चित्रपटांसाठी आम्ही एकत्र काम केलं होतं. मात्र 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीच्या निमित्तानं आम्ही एकत्र येऊन दिग्दर्शन करत आहोत. इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हे नाव काय आहे, त्यात कलाकार-तंत्रज्ञ कोण आहेत या सगळ्याची उत्तरं टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांना मिळतील. मात्र, मराठीत आतापर्यंत कधीच न हाताळला गेलेला विषय आणि पुरेपूर मनोरंजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. एप्रिलमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे,' असं प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी सांगितलं.

Recommended

Loading...
Share