अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि काही दिवसातच या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा इतिहास या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतोय. आणि हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा यासाठी आता बऱ्याच ठिकाणी विविध ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीतील एका अल्पोपहार केंद्रात तर चक्क पाच रुपयात चहाची ऑफर देण्यात आली आहे. “‘तान्हाजी’ चित्रपटाचे तिकीट दाखवा आणि बासुंदी मसाला चहा प्या फक्त ५ रूपयात” अशी ऑफर यांनी सुरु केली आहे. ही ऑफर 31 जानेवारी पर्यंत ठेवण्यात आली आहे.
तर काही ठिकाणी चक्क ‘तान्हाजी’च्या तिकीटावर मोफर प्रवासाची ऑफर देण्यात आली आहे. ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिल्याचं तिकीट दाखवून राजापूर कोंड्ये ते मुंबई खासगी आराम बसचं तिकीट मोफत मिळवण्याची ऑफर भगवती ट्रॅव्हल्सने ग्राहकांना दिली आहे. 21 जानेवारी पर्यंत ही ऑफर सुरु असून याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.
एवढच नाही तर शिकवणीच्या क्लासेसमध्येही अशाप्रकारच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तान्हाजी सिनेमाच्या तिकीटावर बुलडाण्यातील जळगाव-जामोद येथील एक युवकाने स्पर्धा परिक्षांच्या क्लासेसमध्ये 20 टक्के सवलतीची ऑफर सुरु केली आहे.
या विविध ऑफर्सचा लाभ प्रेक्षक घेत असून ‘तान्हाजी’ सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ सिनेमा कोटींचा गल्ला जमवत असून आत्तापर्यंत या सिनेमाने 107.68 कोटी इतकी कमाई केली आहे.