थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा रहस्य सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. सध्या मराठीत जे तरुण निर्माता दिग्दर्शक येत आहेत ते नव्या तंत्रात नव्या शैलीत कलाकृती सादर करत आपली क्षमता दाखवून देतायेत. असाच वेगळा प्रयत्न करीत नंदुरबारच्या भावेश पाटील या तरुणाने आगामी ‘रहस्य’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. सुप्रसिद्ध बॉलीवूड गायिका सुनिधी चौहान यांच्या हस्ते नुकतेच या चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न झाले. यातील टायटल सॉंग सुनिधी चौहान यांनी गायले आहे.
सहलीला गेलेल्या पाच मित्रांच्या बाबतीत अशी काही अनपेक्षित घटना घडते की, त्या घटनेची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. एका प्रश्नाची उकल करत असतानाच दुसऱ्या संकटाची चाहूल लागते. संशयाची सुई सतत एकाकडून दुसऱ्याकडे फिरत असते आणि सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची उकल कशी होते ? घटना घडलेल्या रात्री नक्की काय झालं, ? सत्य काय आहे? याचा शोध घेण्याची जबाबदारी आलेले हे मित्र सत्यापर्यंत पोहचतात का? उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार ? हे या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक तंत्राचा अविष्कार चित्रपटातून पहायला मिळणार आहे. व्हीएफएक्सचा सर्वाधिक वापर यात करण्यात आला आहे. लकी बडगुजर, स्वाती पाटील, ऋतुजा सोनार, स्वाती शुक्ला आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
‘रहस्य’ चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे. चित्रपटाचे छायांकन जितेंद्र आचरेकर, तर संकलन भावेश पाटील यांचे आहे. गायक सुनिधी चौहान, आदर्श शिंदे, प्रेम कोतवाल, यामिनी चव्हाण या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी नरेंद्र भिडे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या प्रसंगाला अनुरूप चार वेगवेगळी गाणी यात आहेत. नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित व मंदार पंडित यांचे आहे. डॉ. माधुरी वडाळकर, दिनेश पाटील चित्रपटाचे सहनिर्माते असून गिरीश सूर्यवंशी कार्यकारी निर्माते आहेत. ऋतूध्वज देशपांडे यांनी चित्रपटाचे व्हीएफएक्स केले आहेत. निर्मिती व्यवस्थापक विजय माळी आहेत. डॉ. अजय फुटाणे या चित्रपटाचे वितरक आहेत.
भय, वास्तव आणि भ्रमाच्या विळख्यातील नेमकं ‘रहस्य’ येत्या 7 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात उलगडणार आहे.